Wednesday , December 10 2025
Breaking News

रक्तदान करत मित्राच्या स्मृती जपल्या; श्रीराम सेना हिंदुस्थानचा उपक्रम

Spread the love

 

बेळगाव : एखाद्या व्यक्तीचे स्वर्गवासी होणे माणसाला भावूक बनवते आणि त्यातून कांही सामाजिक उपक्रम जन्माला येतात. याचे उदाहरण म्हणजे श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळचे आजचे उपक्रम होत. आपल्या मित्राच्या जाण्याने हळव्या झालेल्या मित्रव्दयांनी मित्राच्या स्मृती आणि सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याद्वारे सामाजिक उपक्रम राबवत आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ या संघटनेच्यावतीने कै. अभिषेक पुजारी याच्या स्मरणार्थ आणि सेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते उमेश (पप्पू) कुऱ्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिर रक्तदात्यांच्या प्रचंड प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले.

 

राजहंस गल्ली, अनगोळ येथील सदगुरू सदानंद महाराजमठ येथे आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री भारत मातेच्या तैलचित्राचे पुष्पहार घालून पूजन करण्याद्वारे झाले. तीनशेहून अधिक युवकांनी रक्तदान करत मित्राच्या स्मृती जपल्या आणि सामाजिक बांधिलकीही जपली. याप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अनगोळ येथील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, राजहंस गल्ली, अनगोळ परिसरात श्रीराम सेना हिंदुस्थानचे ज्येष्ठ प्रमुख उमेश (पप्पू) कुऱ्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवतो. मात्र आज हे उपक्रम राबवताना आनंदापेक्षा दुःख अधिक वाटतय. कारण आमचा एक प्रमुख खंदा कार्यकर्ता अभिषेक पुजारी हा आमच्यात राहिलेला नाही. त्याच्या स्मरणार्थ उमेश कुऱ्याळकर यांनी आपल्या वाढदिवसा ऐवजी अभिषेक याच्या स्मरणार्थ आजचे सर्व सामाजिक उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे. ही कृती इतरांसाठी आदर्शवत आहे असे सांगून कोंडुसकर यांनी रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात भरवण्यासाठी कै. अभिषेक पुजारी किती उत्सुक होता हे सांगितले. तसेच अभिषेक पुजारीचे जे स्वप्न होते ते आपण सर्वांनी रक्तदान शिबिर यशस्वी करून पूर्ण करावयास हवे असेही कोंडुसकर यांनी नमूद केले.

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळच्या आजच्या रक्तदान शिबिरास स्थानिक रक्तदात्यांसह शहर परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत रक्तदान केले. त्यामध्ये अनगोळ येथील 192 वेळा रक्तदान करणाऱ्या विनायक धाकलूचे यांच्यासह विक्रमी वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा समावेश होता. दरम्यान, कै. अभिषेक पुजारी याचा स्मरणार्थ आणि सेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते उमेश (पप्पू) कुऱ्याळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराव्यतिरिक्त आज शिबिराच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे अनगोळसह शहरातील सुमारे 1 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, येळ्ळूर येथील एका शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, गोशाळेला चाऱ्याचे दान दिले जाणार आहे.
नंदनमक्कळधाम येथील मुलांसाठी अन्नवाटप उपक्रम राबविला जाणार आहे. सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते सर्वतोपरी परिश्रम घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *