
बेळगाव : आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले असून त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे येत्या 20 जानेवारी 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या सोमवारी सायंकाळी जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत उपरोक्त लाक्षणिक उपोषणाचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बैठकीस माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, महादेव पाटील, साहित्यिक गुणवंत पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर ॲड. अमर यळूरकर, हभप शंकर बाबली महाराज, महादेव पाटील, अनिल पाटील, विकास कलगटगी, चंद्रकांत कोंडूसकर, सागर पाटील, सुनील जाधव, उमेश पाटील, प्रशांत भातकांडे, शिवानी पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यात येऊन येत्या 20 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीनंतर बोलताना सकल मराठा समाजाचे नेते माजी नगरसेवक रणजीत -पाटील म्हणाले की, सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आज झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी जो प्रयत्न सुरू आहे, त्यांना महाराष्ट्रातून प्रचंड पाठिंबा मिळत असताना आम्ही बेळगावकर त्यात मागे नाही हे दाखवून देण्याचे ठरले आहे. त्यासाठी येत्या 20 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.
या उपोषणामध्ये मराठा समाजातील समस्त बंधू भगिनींनी सहभाग दर्शवावा, उपोषणानंतर नवी दिल्ली येथे केंद्र सरकारकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकायांना निवेदन सादर केले जाईल. याव्यतिरिक्त येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिराचा जो लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यादिवशी आपल्या श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेने मोटरसायकल रॅली काढण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये देखील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण -पाटील यांनी केले त्याचप्रमाणे एकाच दिवशी दोन-तीन कार्यक्रम न करता एकत्रित एक मोठा कार्यक्रम केला जावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
Belgaum Varta Belgaum Varta