बेळगाव : सीमाभागात होणारी छोटी छोटी साहित्य संमेलने म्हणजे या भागात भाषिक ऊर्जा निर्माण करणारी केंद्रे झाली असून भाषेच्या माध्यमातून या ठिकाणी संस्कार करण्याचे काम या साहित्य संमेलनामध्ये होत असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मधून जे घडत नाही असे कार्य या छोट्या साहित्य संमेलनामधून होत असून या ठिकाणावरून जाणारा रसिक जाताना नवा विचार घेऊन जात असतो. साहित्य संगीत कला याचा आनंद या ठिकाणी मिळतो. मोठ्या संमेलनातून कागदी फुलांचा उत्सव साजरा होतो, तर येथील छोट्यासंमेलनातून मनाच्या ओंजळीतून रसिक एक नवा विचार घेऊन जातात. या भागात होणारी ही साहित्य संमेलने म्हणजे मराठी भाषिकांची अस्मिता व्यक्त करणारी आहेत. ही साहित्य संमेलने म्हणजे अभिरुची घडविणारी रसशाळाच ठरत आहेत, असे उद्गार सरकारी सरदार्स हायस्कुलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी काढले.
रविवार दि. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या बावीसाव्या उचगांव मराठी साहित्य संमेलनाच्या शामीयानाची मुहूर्तमेढ सोमवार दि. 8 रोजी श्री मळेकरणीदेवीच्या आमराईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बी. एस. होनगेकर होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एन. ओ. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मुहूर्तमेढ श्री. डी. एम. चौगुले, क्लास वन गव्ह. कॉन्ट्रॅक्टर, मण्णूर यांच्याहस्ते करण्यात आली.
श्री मळेकरणीदेवीचे पूजन सचिन नागेंद्र तरळे, इंजिनिअर व क्लास वन गष्ह. कॉन्ट्रॅक्टर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाळकृष्ण खाचो तेरसे, उपाध्यक्ष, ग्रा. पं. उचगांव, सौ. मथुरा बाळकृष्ण तेरसे, अध्यक्षा, ग्रा. पं. उचगांव, अशोक कांबळे, बळवंतराव देसाई, योगिता देसाई, कृष्णाजी कदम पाटील, साहित्य अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर आदी उपस्थित होते. बाळासाहेब देसाई यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन. ओ. चौगुले यांनी केले.