बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक दिनांक 8 जानेवारी रोजी मराठी विद्यानिकेतन येथे संपन्न झाली. बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व साहित्यिक कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या कथासंग्रहासाठी यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला व सर्वांनुमते हा ठराव संमत करण्यात आला आणि कृष्णात खोत यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांनी पाठविलेल्या परिपत्रकानुसार दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासंदर्भात बैठकीमध्ये नियोजन करण्यात आले. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा त्याचबरोबर मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी या पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसंवाद, व्याख्याने, कवी संमेलन, निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, शब्दकोडी यासारख्या स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावरील मुलांसाठी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांवरील शिबिरे घेण्यात येतील. साठे प्रबोधिनी राज्य मराठी विकास संस्था व मराठी भाषा विभाग यांनी सुचवलेल्या कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन करते यावर्षीही मोठ्या उत्साहाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. बैठकीला उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील चिटणीस सुभाष ओऊळकर सुरेश गडकरी, अनंत जांगळे, विजय बोंगाळे, बी. बी. शिंदे, इंद्रजीत मोरे, प्रसाद सावंत, गजानन सावंत उपस्थित होते. आभार सुरेश गडकरी आणि मानले.