
बेळगाव : मुंबई वाशी येथे दुसरे विश्व मराठी संमेलन सुरू आहे. मराठी भाषा संवर्धनाबाबत संमेलनात काही निर्णय घेण्यात येतील आणि त्याचा उपयोग मराठी भाषिकांना होईल यात संशय नाही. संमेलनास महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 67 वर्षे लढा देत आहे. आमची संस्कृती, लिपी, भाषा टिकविण्याचे काम करत असताना येथील सरकारच्या अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचा दावा प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकार येथील मराठी संस्कृती आणि भाषा संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर संमेलनात विचार होणे आवश्यक आहे. 2012-13 आणि 2013- 2014 सालच्या महाराष्ट्र सरकारच्या अंदाजपत्रकात माननीय श्री. अजितदादा पवार यांनी सीमाभागातील मराठी जनतेच्या संस्थांसाठी खास तरतूद करून मदत दिली होती पण 2014 नंतर ही मदत बंद केली आहे. आपण लक्ष घालून येथील मराठी शाळा, वाचनालय, साहित्य संमेलने यासाठी व मराठीचे संवर्धन संरक्षण करणाऱ्या उपक्रमशील संस्थांसाठी आवश्यक ती तरतूद करावी ही प्रार्थना. येथील वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी मराठी भाषेसाठी प्रयत्न करणारी संस्था असून या संस्थेचा 25 वा मराठी भाषा दिवस रौप्य महोत्सवी वर्ष कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी आपण बेळगावला यावे व मराठी भाषिक व संस्था पदाधिकाऱ्यांशी संवाद करावा अशी ही विनंती करत आहे. आपल्या सोयीची तारीख कळवावी, अशी विनंती महाराष्ट्राचे मराठी भाषा व शिक्षण विभाग मंत्री दीपक केसरकर यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta