
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या 1977 बॅचचे दहावीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सुमारे 47 वर्षानंतर एकमेकांना भेटले. सुमारे साडेचार दशकानंतर एकमेकांना भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह जाणवत होता. प्रत्येक जण एकमेकाची आदराने चौकशी करीत होते, काहीजण एकमेकांना मिठी मारून जुन्या आठवणीमध्ये रमत होते. प्रत्येकाला शाळेमधील ते दिवस आठवत होते. या बॅचचे सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी आता सेवानिवृत्त झाले आहेत. या सेवानिवृत्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा येळ्ळूर रोड येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यासाठी येळ्ळूरसह सुळगे, पुणे, गोवा, सावंतवाडी, कोल्हापूर, धारवाड, बेळगाव, हुबळी येथे राहणारे विद्यार्थी उत्साहाने स्नेह मेळाव्यासाठी येळळूरला आले होते. प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत प्रा. पी. बी. चिट्टी यांनी केले. त्यानंतर दिवंगत विद्यार्थी विद्यार्थिनी, तसेच आपल्या देशाच्या सीमेवर लढताना हुतात्मा पत्करलेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार मेजर गंगाराम बी. चिट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या, तर काहींनी नृत्य केले. यावेळी वाय. पी. देसुरकर, सेवानिवृत्त कॅप्टन पी. बी धामणेकर, प्रा. एल. पी. पाटील, शिक्षिका सुमन कंग्राळकर, प्रेमा सुतार, सावित्री डोण्यांनावर, शिक्षक शंकर नंदी, मनोहर नायकोजी, शट्टू पा जाधव, यांनीही मनोगत व्यक्त केले. स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी सुभेदार मेजर गंगाराम चिट्टी, वाय. पी. देसुरकर व पी.बी. धामणेकर यांनी परिश्रम घेतले. शेवटी स्नेहा भोजनाने मेळाव्याची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta