
बेळगाव : बेळगाव -अयोध्या -बेळगाव या भारतीय रेल्वेच्या विशेष अयोध्या ट्रेनचे बेळगावात भव्य स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापन सोहळ्यानंतर राम भक्तासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या अयोध्या स्पेशल ट्रेनचे आज अयोध्येकडे प्रस्थान झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे स्वागत आणि अयोध्येला जाणाऱ्या भक्तांना निरोप देण्याचा समारंभ आज पार पडला. हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते या रेल्वेचे पूजन करण्याबरोबरच हिरवे निशाण दाखवून रेल्वेसह श्री रामल्लाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना निरोप देण्यात आला. जय श्रीराम, जय जय श्रीराम असा जयघोष करीत भक्त अयोध्येकडे मार्गस्थ झाले.
यावेळी हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले की, राम मंदिराची उभारणी हे भारतीयांचे स्वप्न आहे आणि ते प्रत्यक्षात आले आहे. आम्हालाही ते सौभाग्य लाभले. बेळगाव जिल्ह्यातून आम्ही राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी झालो होतो. आज बेळगाव जिल्ह्यातील 200 रामभक्त रामाचे दर्शन घेण्यासाठी विशेष रेल्वेने अयोध्येला जात आहेत त्या सर्वांना शुभेच्छा. यावेळी रेल्वे अधिकारी आसिफ हाफिज यांनी या अयोध्या स्पेशल रेल्वेची माहिती दिली. या रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादगिरी हे सर्वात शेवटचे बोर्डिंग स्टेशन आहे. प्रवाशांना सुरक्षित नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे. कर्नाटतील तिसऱ्या फेजची ही गाडी असून बेळगावमधून ही पहिलीच गाडी सोडण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta