बेळगाव : बेळगाव आणि गोवा यांचे संबंध जुने आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी बेळगाव ते गोव्याला जोडण्यासाठीचा मार्ग चांगल्या स्थितीत असण्याची गरज आहे. मात्र सध्याची परिस्थिती कठीण बनली असून चोरला आणि अनमोड मार्गे गोव्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावे. अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
गुरुवारी नितीन गडकरी बेळगाव रिंगरोड निर्मितीच्या उद्घाटनासाठी आले असता बेळगाव ट्रेडर्स फोरमने त्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित रस्त्यांच्या युद्धपातळीवरील कामाची प्रचंड मोठी गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, सदस्य किरण गावडे, अरुण कुलकर्णी व इतर यावेळी उपस्थित होते. पर्यटनासाठी बेळगावचे नागरिक गोव्यावर अवलंबून आहेत तर व्यापारासाठी गोमंतकीय नागरिक बेळगाव वर अवलंबून आहेत त्या निमित्ताने रोजची वाहतूक ठरलेले असते मात्र वाहतुकीतील अडथळे या संबंधांवर परिणाम करत असल्याचे नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
याचवेळी गोव्याच्या मोपा विमानतळाला जोडणाऱ्या चंदगड मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या सर्वेक्षणाची आणि महामार्ग स्वरूपात उभारण्याची मागणी करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीकडे तातडीने लक्ष देण्यात येईल असे आश्वासन बेळगाव ट्रेडर्स फोरमला दिले आहे.