येळ्ळूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी समाजामध्ये पेरलेले विचार आचार अंमलात आणणे ही आजच्या युवा पिढीची गरज आहे, शिवरायांनी स्थापन केलेले हे हिंदवी स्वराज्य कसे करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, छत्रपती शिवरायांचे विचार जिवंत ठेवणे काळाची गरज आहे त्यांच्या विचारातूनच सुराज्य आपल्याला निर्माण करता येईल, 350 वर्षानंतर सुद्धा आजची युवा पिढी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम दाखवते, अस्था दाखवते ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे, आजच्या युवा पिढीने छत्रपतींच्यासारखे स्वाभिमानी रहाणे गरजेचे आहे, येळ्ळूरच्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्र चौकात अश्वारूढ शिव पुतळा उभारला याचा मला अभिमान वाटतो आहे. सीमा लढ्यात अग्रेसर असलेले व स्वाभिमानी गाव म्हणजे येळ्ळूर, संस्कारक्षम व सुसंस्कृत राज्य आपल्याला घडवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपली लढाई आता पुस्तक वाचून होणार आहे, युवा पिढीने पुस्तके वाचून शिवरायांचे शौर्य, धाडस त्यांचे आचार विचार अंगीकारणे गरजेचे आहे, असे विचार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले. ते हिंदवी स्वराज युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र चौकात उभारलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातूमूर्ती लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याच हस्ते अश्वारूढ शिवमुर्तीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूरचे डॉ. अमर अडके हे उपस्थित होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर हे उपस्थित होते.
यावेळी चौथरा प्रवेशद्वाराचे उद्घाटन येळळूर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजमुद्राचे उद्घाटन बाळासाहेब पावले यांनी केले. ग्रंथालय प्रवेशद्वाराचे पूजन चंद्रकांत इंजल यांनी केले. शिवचरित्र ग्रंथाचे पूजन परशराम पाटील यांनी केले, ग्रंथालयाचे उद्घाटन शिवाजी सायनेकर यांनी केले. गंगापूजन परशराम धामणेकर यांनी केले. ध्वज पूजन प्रवीण मेलगे व जावेद ताशेवाले यांनी केले, जिजामाता फोटोचे पूजन एन. डी. पाटील यांनी केले, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिमेचे पूजन सतीश पाटील यांनी केले, जोतिबा फुले प्रतिमेचे पूजन प्रशांत नंदिहळ्ळी व सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन महेश सारावरी यांनी केले, तर द्वीपप्रज्वलन प्रकाश अष्टेकर, परशराम घाडी, डी. जी. पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील, सतीश धामणेकर, प्रभाकर मंगनाईक, प्रकाश तोपिनकट्टी व रावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाप्रसादाचे पूजन विलास घाडी, जोतिबा काळसेकर, राजू पाटील व दीपक कर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्याख्याते डॉक्टर अमर अडके यांनीही शिवरायांचा इतिहास शिवभक्तांना सांगितला. यावेळी बोलताना ते म्हणाले, येळ्ळूर गाव हे कोणाच्याही समोर झुकणारे गाव नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, येळ्ळूर विषयी माझ्या मनात अभिमान आहे स्वाभिमान आहे, तुम्ही येळ्ळूर गावामध्ये शिव पुतळा उभा करून मोठ पुण्याईचं काम केलं आहात. तुमच्या जिद्दीला मी सलाम करतो, शिवाजी महाराज हे पूर्ण पुरुष होते. त्यांचा आदर्श आपण घेणे गरजेचे आहे.
प्रस्ताविक हिंदवी स्वराज्य संघटनेचे सचिव चांगदेव मुरकुटे यांनी केले, यानंतर मुलींनी स्वागत गीत गायले, संघटनेच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मूर्तिकार विक्रम पाटील व अभियंते हणमंत कुगजी यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी राजू पावले, दुध्दाप्पा बागेवाडी, डॉ. तानाजी पावले, किरणअण्णा पाटील, प्रकाश घाडी, डॉ. सतीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे व युवराज पाटील यांनी केले, तर आभार प्रा. सी.एम. गोरल यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी येळ्ळूरवासीय नागरिक, शिवभक्त, महिला व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. शिवभक्तांनी तसेच महिला व बालगोपालांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.