युवा समितीतर्फे सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

बेळगाव : ‘मराठी भाषेचा आत्मा हा प्राथमिक मराठी शाळा आहेत. याकडे सरकार व समाजाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शाळा टिकली तर मराठी टिकणार आहे. बेळगावात अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत. ही स्थिती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मार्गदर्शन निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (ता. २) आयोजित केला होता. ‘मराठा मंदिर’च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. धर्म कोणताही असो, भाषा ही महत्त्वाची आहे. भाषेच्या विकासासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे. प्राथमिक शाळांची पटसंख्या १०० टक्के असली पाहिजे, तरच शाळा टिकतील. एकेकाळी प्राथमिक शाळा सर्वधर्मीयांची होती. ती आता राहिली नाही. इंग्रजी शाळेत शिक्षण दिल्याने मुलांना चांगली इंग्रजी येते, हा समज बाजूला ठेवा, तरच मराठी शाळांची संख्या वाढेल, असे प्रा. मेणसे म्हणाले. प्राथमिक शाळांची अवस्था वाईट आहे. शाळांचे बकालीकरण केले जात आहे. मराठीचा पहिला शत्रू देशातील भांडवलशाही आहे. शाळा सुधारणा समितीकडे अनेक अधिकार आहेत. ते त्यांना माहिती नाहीत. त्यासाठी युवा समितीने एक कार्यक्रम आयोजित करून, त्यांचे अधिकार त्यांना समजावून सांगावेत. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमात पुस्तके भेट दिली पाहिजेत. आपण पुस्तकात गुंतवणूक केली पाहिजे. मराठी टिकविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक बदल मुलांमध्ये आले पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी केले.
व्यासपीठावर युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. अमर येळ्ळूरकर, साधना मयेकर, रमाकांत कोंडूसकर, माजी महापौर सरिता पाटील, ऍड. नागेश सातेरी, अमेय पाटील, महादेव चौगुले, आप्पासाहेब गुरव, आर. एम. चौगुले, बी. ओ. येतोजी, आबासाहेब दळवी, मदन बामणे, सचिन केवळेकर, नेताजी जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सिद्धार्थ चौगुले यांनी केले.
आदर्श शाळा पुरस्कार
बेळगावमधील पाच मतदारसंघनिहाय ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देण्यात आले. बेळगाव उत्तर- कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळा, कॅम्प बेळगाव, बेळगाव ग्रामीण-बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, बेळगाव दक्षिण- सरकारी मॉडेल शाळा येळ्ळूर, खानापूर-सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चिकले, यमकनमर्डी-सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळा काकती या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धेच्या बक्षीसांचेही मान्यवरांच्या हस्ते वितरण झाले.
Belgaum Varta Belgaum Varta