बेळगाव : एकीकडे जगभरात महिला दिन साजरा होत आहे. नारीशक्ती, महिला सबलीकरणावर भाष्य होत असतानाच महिला दिनी वॉर्ड क्र. ५० मधील संभाजी नगर परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वॉर्ड क्र. ५० मधील संभाजी नगर परिसरात मागील तीन ते चार महिन्यापासून येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या बेळगांव शहरात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे बऱ्याच विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे तर बऱ्याच विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरल्यामुळे संभाजी नगर परिसरातील नागरिकांची संपूर्ण भिस्त ही बोअरवेलच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र या परिसरात बोअरवेल असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. संभाजी नगर येथे बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेकडून बोअरवेलच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो मात्र पाटील गल्लीच्या मागील भागात असलेली बोअरवेल मागील काही दिवसांपासून नादुरुस्त झाली आहे. त्याठिकाणी बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यामुळे ती टाकी काढून बाजूला ठेवण्यात आली आहे तर त्या टाकीचे लोखंडी स्टँड देखील इतरत्र धूळ खात पडलेले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नुकतेच या परिसरातील एका महिलेने वॉर्ड क्र.५० च्या नगरसेविकेला सदर समस्या सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या नगरसेविकेने सदर महिलेवर तोंडसुख घेत तुम्ही आमच्या पक्षाचे मतदार नाही आहात, तुम्ही आम्हाला मतदान केलेलं नाही आणि जर केलं असेल तर तसा पुरावा आम्हाला द्या, अशी अरेरावी केली. यापूर्वी देखील वॉर्डमध्ये ड्रेनेज समस्या निर्माण झाली होती त्यावेळी देखील या नगरसेविकेने असेच उत्तर येथील नागरिकांना दिले होते. त्यामुळे वॉर्ड क्र.५० च्या नगरसेविकेच्या विक्षिप्त वागण्याला येथील जनता कंटाळली आहे. त्यामुळे संभाजीनगर येथील पाणी समस्येवर संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन ही पाणी समस्या तात्काळ सोडवावी अन्यथा वॉर्ड क्र.५० मधील जनता महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा येथील महिलांनी दिला आहे.