
शिनोळी : महाराष्ट्राचे वावडे असणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या व्यावसायिक अस्थापनांवर तसेच शिनोळी चंदगड येथील त्यांच्या फलकांवर आज रविवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासत “जय महाराष्ट्र” असे लिहिले. “जय महाराष्ट्र” म्हणावयास नको आणि महाराष्ट्रात उद्योग का हवेत असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
चार दिवसांपूर्वी आनंदवाडी कुस्ती आखाडा बेळगाव येथे नेपाळचा मल्ल देवा थापा यांनी “जय महाराष्ट्र” असे म्हणताच त्याला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून रोखत आम्ही कर्नाटकात राहतो येथे जय महाराष्ट्र म्हटल्यास उंची कमी होईल असे अपमानजनक वक्तव्य करून तमाम मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या होत्या. श्रीकांत देसाई यांच्या या वक्तव्याचा बेळगावसह सीमा भागातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. उद्योजक श्रीकांत देसाई यांची शिरोळी महाराष्ट्र येथे व्यवसायिक आस्थापने आहे. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन निदर्शने करत त्यांच्या फलकांवर काळे फासले आणि महाराष्ट्रद्वेष्ट्या श्रीकांत देसाई यांना चांगलाच इशारा दिला. महाराष्ट्रात व्यवसाय करावयाचा असेल तर महाराष्ट्राचा सन्मान राखावाच लागेल अन्यथा मराठी भाषिक शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी युवा नेते शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सुरज कणबरकर, मनोहर हुंद्रे, रवी निर्मलकर, प्रवीण रेडेकर, सचिन दळवी, मल्लप्पा पाटील, किरण मोदगेकर, राजू पाटील, मोतेश बारदेशकर, चंदगड युवा सेनेचे विक्रम मुतगेकर, महेंद्र जाधव यांच्यासह म.ए. समिती आणि युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta