Friday , March 6 2026
Breaking News

डॉ. विनोद गायकवाड हे मातृस्मृती पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या “मिडल क्लास” या कादंबरीला कामेरी येथील कामेश्वरी साहित्य मंडळाचा ‘राज्यस्तरीय मातृस्मृती पुरस्कार’ नूकताच प्रदान करण्यात आला. संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांच्या हस्ते रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ यासह पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, चंद्रकुमार नलगे, कथाकार आप्पासाहेब खोत व धनाजी घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. गायकवाड म्हणाले की, ‘सीमाभागामध्ये अनेक लेखक -कवी सकस साहित्य निर्मिती करीत आहेत, मात्र त्यांची दखल महाराष्ट्रामध्ये सहसा घेतली जात नाही. मात्र हा मातृभूमी पुरस्कार माझ्या कादंबरीला मिळाल्यामुळे दि. बा. पाटील सरांनी सीमावासियांना एक दिलासा दिला आहे. सीमा वासियांचा प्रतिनिधी म्हणून मी या पुरस्काराचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो. मातृभूमी पुरस्कारामुळे सीमालेखक व महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक साहित्यिक अनुबंध निर्माण झाला आहे. मातृस्मृती ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात सीमाभाग आणि गोवा येथील साहित्याचा गौरव करून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे यापुढे खास त्यांच्यासाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली. पुरस्काराचे प्रणते प्रा. दि. बा. पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, ‘सीमाभाग आणि गोमंतकातील साहित्यांचा दर्जा उच्च असून सारे साहित्यिक एकच आहेत म्हणून आम्ही आवर्जून दखल घेतली आहे’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. विनोद गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *