येळ्ळूर : सरकारी मराठी उच्च प्राथमिक माॅडेल शाळा येळ्ळूर शाळेची स्थापना सन् 1874 साली झाली. बरोबर 2024 यावर्षी शाळेला दीडशे वर्षे पूर्ण होतात. पण शाळेला आजपर्यंत क्रीडांगण नव्हते. सध्या शाळेची परिस्थिती पाहता शाळा भौतिक रूपाने गुणवत्तेने, अगदी समृद्ध आहे. पण विद्यार्थ्यांच्या शारीरिक गुणवत्तेत भर पाडण्यासाठी आणि एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टिकोनातून शाळेला क्रीडांगण असणे ही फार महत्त्वाची बाब होती हे लक्षात येताच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, एस. डी.एम.सी., माजी विद्यार्थी यांनी शाळेला क्रीडांगण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले. गेल्या कित्येक वर्षापासून हे प्रयत्न चालू होते पण त्याला आज यश आले.
या संदर्भात वारंवार येळ्ळूर ग्रामपंचायतकडे यासंदर्भात अनेक निवेदने सादर होत होती यावर कित्येक वेळा बैठक घेऊन चर्चाही होत होत्या. यासाठी ग्राम पंचायतीने शाळेसाठी गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गायरान जागे पैकी दोन एकर जमीन शाळेला मैदान करण्यासाठी मंजूर केले. हे होत असतानाच योगायोगाने भीमा कोरेगाव स्तंभाच्या उद्घाटनासाठी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी येळ्ळूरला भेट दिली. याचे औचित्य साधून शाळेच्या शिक्षकांनी आणि एस.डी.एम.सी. सदस्यांनी त्यांना मैदानाच्या अभिवृद्धीसाठी निधी मंजूर करावा म्हणून निवेदन दिले. आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाचा विचार करून योग्य निधी त्वरित मंजूर केला.
या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आज शनिवार दिनांक 16 मार्च 2024 रोजी दुपारी 1:00 वा. काँग्रेसचे जिल्हा जनरल सेक्रेटरी श्री. प्रदीप एम. जे., बेळगाव दक्षिणचे अध्यक्ष श्री. परशराम ढगे, बेळगाव ग्रामीणचे अध्यक्ष श्री. किरण आण्णा पाटील, नेते बसवराज शेगावी, अनंतकुमार बेकवाड, पांडुआण्णा दोडण्णवर, माजी नगरसेवक भैरगौडा पाटील, मारीहाळ ग्रा.पं. उपाध्यक्ष श्री. असिफ मुल्ला, येळ्ळूर ग्राम पंचायत पी. डी. ओ. मॅडम, उपाध्यक्ष श्री. प्रमोद पाटील सर्व ग्राम पंचायत सदस्य, सदस्या यांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांचे शाल स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्राम पंचायत सदस्य श्री. सतिश बा. पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे या कामासाठी शाळेचे निष्ठावंत विद्यार्थी, येळ्ळूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य, शिक्षणप्रेमी, क्रीडाप्रेमी, समाज सुधारक श्री. सतीश बा. पाटील यांनी क्रीडांगणला जागा मिळून देण्यासाठी तसेच क्रीडांगणाच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करून घेतली. गेली कित्येक वर्ष शाळेला क्रीडांगण मिळवून देण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. दिवसरात्र या कामासाठी ते झटत होते. त्यांच्या या सततच्या निःस्वार्थ प्रयत्नांमध्ये त्यांना सध्याच्या ग्रामपंचायतीच्या पी.डी.ओ. मॅडम, ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष श्री. प्रमोद पाटील, सर्व सदस्य /सदस्या, आजी-माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य /सदस्या येळ्ळूरचे सर्व नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी बोलतांना सतीश पाटील म्हणाले, यापुढेही अभिवृद्धीच्या कामासाठी या परीसरातल्या लोकांना व गावकऱ्यांना, गावातील जेष्ठ नागरिकांना घेऊन या क्रीडांगणाचा विकास करूया तसेच हे क्रीडांगण गावच्या मध्यभागी असल्यामुळे याचा उपयोग शाळा व गावातील शैक्षणिक, क्रीडा स्पर्धाना, सामाजिक तसेच धार्मिक आशा विविध कार्यक्रमाना या क्रीडांगणाचा उपयोग होणार आहे. यासाठी गावातील संपुर्ण नागरिकांचे सहकार्य फार मौलाचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे आणि ते लाभणारच आहे. त्यामुळे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून यापुढेही निःस्वार्थ भावनेने सतत कार्यरत असणे हे एक सुजाण नागरीक म्हणून मी माझे कर्तव्य समजतो. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष श्री. प्रमोद पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मैदान उपलब्ध झाले याचे आम्हाला समाधान लाभले. शाळेने भविष्यात चांगले खेळाडू निर्माण करावेत म्हणून शुभेच्छा दिल्या. अभिवृद्धीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शाळेचा संपूर्ण शिक्षकवर्ग, एस.डी.एम.सी., शिक्षण प्रेमी ,पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस्. बी. पाखरे यांनी केले. प्रभारी मुख्याध्यापिका सौ. एस्. आर. निलजकर यांनी आभार मानले.