
बेळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतीण महिलेचा आणि तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. संतीबस्तवाड येथील या महिलेची किणये प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर थोड्याच वेळात अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय.
बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील २८ वर्षीय लक्ष्मी लगमप्पा हळ्ळी या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिला प्रसूती वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी लक्ष्मीला रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी रात्री उशिरा बेळगाव तालुक्यातील किणये येथील समुदाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पहाटे तेथे लक्ष्मीने बाळाला जन्म दिला. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी बेळगाव बिम्स रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला बेळगावला आणण्यात आले. तोवर अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टर आणि नर्सच्या दुर्लक्षामुळे लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना निंगाप्पा पडकेरी यांनी सांगितले की, लक्ष्मीला प्रसूतिवेदना सुरु झाल्याने संतीबस्तवाडजवळच्या किणये समुदाय आरोग्य केंद्रात रात्री दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रसूती होऊन तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर काहीवेळाने तिने चहा व बिस्कीट घेतले. नंतर तिला खूप रक्तस्त्राव सुरु झाला. त्यावेळी तिच्यावर खबरदारी घेऊन उपचार करणे आवश्यक होते. कारण प्रसूतीनंतर बीपी, शुगर कमीजास्त होते. मात्र उपचार करण्याऐवजी तिला बेळगावात बीम्स इस्पितळात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात डॉक्टर व नर्सचे दुर्लक्ष झाले असावे अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. लक्ष्मीचा पती लगमाप्पा हळ्ळी याने प्रसारमाध्यमांशी बोलताना, किणये आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणानेच पत्नी लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. रविवारी रात्री दीडच्या सुमारास तिला किणये आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. सव्वातीनच्या सुमारास तिची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. नंतर काही वेळातच तिला अतिरक्तस्राव सुरु झाला. त्यावेळी तिच्यावर योग्य उपचार करण्याऐवजी बेळगावातील बिम्स हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देण्यात आला. लक्ष्मीच्या प्रसूती शस्त्रक्रियेवेळी केंद्रात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तेथील नर्सने तिची प्रसूती केली. त्याठिकाणी रुग्णवाहिकाही नव्हती. त्यामुळे आम्ही खासगी कारमधून तिला बीम्स इस्पितळात नेले. पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. किणये आरोग्य केंद्रात रुग्णांना योग्य उपचार व सुविधा मिळत नाहीत. तेथे रग्णवाहिकाही नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होतात. आपल्या पत्नीच्या मृत्यूला आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सचा हलगर्जीपणाच कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बिम्स इस्पितळाच्या शवागारात लक्ष्मीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी तिची आई व कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एकंदर, किणये आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आणि नर्सच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळेच लक्ष्मी हळ्ळी या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच यातील सत्य बाहेर येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta