
बेळगाव : आपल्या वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत असणार्या जायंटस् ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने यंदाची रंगपंचमी अनाथ मुलांसमवेत साजरी करण्यात आली. कंग्राळी खुर्द येथील समृद्धी फाऊंडेशन अनाथालयात साजर्या झालेल्या या रंगपंचमीत चिमुकल्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
जायंटस् मेनतर्फे गेल्या काही वर्षांपासून अनाथ व वंचित मुलांसमवेत रंगपंचमी साजरी करण्याचा पायंडा पाडला आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी कंग्राळी खुर्द येथील समृद्धी फाऊंडेशनमध्ये होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जायंटस् मेनकडून मुलांना रंग देण्यात आलेच, शिवाय त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली. यंदाची पाणी टंचाई लक्षात घेता कोरड्या रंगाद्वारे होळी खेळण्याचे आवाहन जायंटस् सह विविध संघटनांंनी केले आहे. ते अंमलात आणत जायंटस् नेही कोरडी होळी खेळली.
जायंट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील यांचा आजच वाढदिवस होता तोही या मुलांसमवेत साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, विजय बन्सूर, डॉ. विनोद गायकवाड, संजय पाटील, सुनिल मुतगेकर, संजय सूर्यवंशी, अरुण काळे, भरत गावडे, उमेश पाटील, अनिल चौगुले, आनंद कुलकर्णी, प्रदीप चव्हाण, महेश रेडेकर, सुनिल पवार, राजेंद्र जैन यांच्यासह जायंट्सचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta