बेळगाव : गणेशपूर भागातील एका रहिवासी कॉलनीमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एम ई एस कॉलनी मधील खुल्या जागेत काही वर्षांपूर्वी कॉलनीतील दानशूर लोकांच्या सहभागातून लहानसे गणेश मदिर उभारण्यात आले आहे. सदर जागेचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याने लोकप्रतिनिधींच्या मदतीने निवडणुकीच्या तोंडावर सदर जागेच्या विकासाचा नारळ फोडण्यात आला. सदर मंदिर परिसराला तटबंदी आणि सोबत आतमध्ये बसण्याचे बाक आणि उद्यान अश्या संकल्पनेत विकास आराखडा राबविण्याची तयारी सुरू असताना एका स्थानिक नागरिकाच्या हट्टी भूमिकेमुळे या ठिकाणी लावण्यात आलेली अनेक झाडे काढण्यात आली.
या जागेच्या सभोवती राहणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी सुरवातीला जी झाडे लावली होती आज त्यांची चांगली वाढ होऊन मोठ्या वृक्षात रूपांतरित झाली असताना कोणतेही कारण नसताना फक्त एका हेखेखोर माणसाच्या वृत्तीमुळे त्या ठिकाणची झाडे तोडण्यात आली. जागेच्या तटबंदी साठी हि झाडे तोडण्याची गरज नव्हती. सदर झाडे तशीच ठेवून तटबंदीची उभारणी करता आली असती अशी इतर स्थानिकांची मागणी असताना फक्त वयक्तिक मोठेपणासाठी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याच कॉलनीत अन्यत्र दोन ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून शेड उभारण्यात आले असताना त्यावर मात्र अळीमिळी गुपचिळी अशी भूमिका झाडे तोडण्याच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकांची आहे असे काही स्थानिकांनी कळविले आहे. या संबंधी वन विभाग आणि हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्याकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.