(८)
लोकसभा निवडणुकीसाठी आता दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. एकीकडे एक एक जागा जिंकण्यासाठी राष्ट्रीय पक्षांची धडपड सुरू असताना दुसरीकडे सीमाभागात मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. बेळगाव लोकसभेसाठी यंदाही समितीची बांधणी सुरू असताना खानापूर घटक समितीने सुद्धा कारवार लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तसं पाहायला गेलं तर सीमा लढा हा कारवारपासून बिदरपर्यंत विखुरलेल्या मराठी माणसाचा लढा आहे. यात प्रामुख्याने बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील बहुतांश भाग आहे. आणि या दोन जिल्ह्यातील अनुक्रमे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार अश्या तीन लोकसभा मतदारसंघात हा भाग पसरलेला आहे. पण मतदारसंघाची तोडफोड करून अगदी पद्धतशीरपणे मराठी प्राबल्य असणारे भाग जाणूनबुजून कन्नड बहुल भाषिक भागाशी जोडून या तीनही मतदार क्षेत्रात मराठी माणूस निवडून येणार नाही याची पूर्ण खबरदारी पूर्वीपासून घेतली आहे. पण मराठी माणूस एकवटला की भल्याभल्यांना घाम फुटतो हेच खरे. त्याचा प्रत्यय मागच्या बेळगाव लोकसभा पोटनिडणुकीत सगळ्यांनाच आला. सत्ताधारी भाजपला ही जागा शाबूत ठेवण्यात नाकीनऊ आली कारण एकच मराठी माणसाची एकजूट. त्यामुळेच यंदा खानापूर घटक समितीने सुद्धा कारवार लोकसभेची जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव जिल्ह्याचा भाग असणारा खानापूर तालुका कारवार लोकसभेची जोडणे तसे खोडसाळच म्हणावे लागेल. पण एकवटलेल्या मराठी माणसाच्या निर्धरामुळे बेळगाव प्रमाणे या मतदारसंघात देखील राष्ट्रीय पक्षांची गोची होणार म्हणून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मराठी माणसाला आपल्याकडे वळविण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू केले आहेत. पैशाच्या बळावर असो किंवा दिशाभूल करणारी परिस्थिती निर्माण करून गैरसमज पसरवून का असेना मराठी माणसाला आपल्याकडे वळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. एकीकडे समितीमध्ये पाकिटाची सवय लागलेल्या लोकांनी मराठी भाषिकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असून त्याचा प्रत्यय जांबोटी येथे झालेल्या काँग्रेसच्या एका सभेत आला. नेहमी समितीत प्रामाणिक असल्याचा आव आणीत भाषणबाजी करणाऱ्या महादेव घाडी, शामराव पाटील व लक्ष्मण कसरलेकर यांनी जाहीरपणे काँग्रेसचा उदो उदो केला होता.
दुसरीकडे जे लोक समितिनिष्ठ म्हणून प्रामाणिक राहिलेत त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून उरलेली मते भाजपाच्या गोटात ओढण्यासाठी मराठी माणसाशी बेईमानी करून सत्तेसाठी समितीशी विद्रोह करून भाजपात गेलेल्या माजी आणि आजी अश्या दोन्ही आमदारांनी खालच्या पातळीवरील कामे सुरू केली आहेत. दारात आलेल्या माणसाला आदर देणे ही मराठी माणसाची संस्कृती असल्याने त्याचा फायदा उठवत दोन्ही आजी- माजी आमदार महोदय समितीच्या नेत्यांच्या दारात मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरत आहेत. पण मराठी माणूस गळाला लागत नाही म्हंटल्यावर मुद्दाम त्यांच्या गळ्यात पडून आपल्या कार्यकर्त्यांकरवी फोटो सेशन करून सामान्य समितीनिष्ठ मतदाराला संभ्रमावस्थेत पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे. राजकारणात “सब कूछ चलता” म्हणत सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही थराला हे राष्ट्रीय पक्षाचे लोक जात आहेत. विधानसभेचे समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेवून भगवी शाल गळ्यात घालून जणू काही समितीच्या नेत्यांनी भाजपशी सलगी केली आहे असे भासविण्यासाठी समाजमाध्यमांवर फोटो वायरल केले जात आहेत. पण मराठी माणसाने या सगळ्या उपद्रवी कृत्यांना भीक न घालता सावध होणे गरजेचे आहे आणि नेतृत्वाने देखील स्वतःच्या कोणत्याही कृत्यामुळे मराठी माणसाची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. राजकारणात सगळेच लोक मित्र होत नसतात काही जण मैत्रीतून स्वार्थासाठी दगाबाजी करणारे असतात हे ओळखणे गरजेचे आहे.