बेळगाव : म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजी उद्यान येथून मूक सायकल फेरी काढण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा तसेच कर्नाटक राज्याविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या असून कायद्याचा भंग केला आहे, असे कारण पुढे करून म. ए. समितीच्या नेत्यांनी जामीन घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
म. ए. समितीच्या मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण- पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे, गजानन पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, नेताजी जाधव यांच्यावर मार्केट पोलीस स्थानकात भा.दं.वि. १४३, १५३, २९० सहकलम १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या लोकसभा निवडणूक असून पुन्हा आपण कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची, आचारसंहिता भंग करण्याची शक्यता आहे. तेव्हा ५० हजारांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्याच रकमेचे दोन जामीनदार घेऊन शुक्रवारी पोलीस आयुक्तांसमोर हजर राहावे व जामीन घ्यावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.