बेळगाव : भारत विकास परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा दायित्वग्रहण समारोह रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, सेक्रेटरी म्हणून के. व्ही. प्रभू आणि खजिनदार म्हणून डी. वाय. पाटील यांनी “दायित्व” स्विकारले. प्रमुख अतिथी म्हणून एलआयसीचे निवृत्त विभागीय अधिकारी व रंगसंपदाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी आणि संगीत कलाकार संघाचे अध्यक्ष पं. नंदन हेर्लेकर उपस्थित होते.
प्रारंभी भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. रजनी गुर्जर यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. श्रीशा मोरेने सुंदर प्रार्थना प्रस्तुत केली. मावळते अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेक्रेटरी मालतेश पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. डॉ. व्ही. बी. यलबुर्गी व अक्षता मोरे यांनी प्रमुख अतिथिंची ओळख करून दिली.
डॉ. जे. जी. नाईक यांनी भारत विकास परिषदेची राष्ट्रीय ध्येयधोरणे तसेच परिषदेच्या एकंदर कार्याची विस्तृत माहिती दिली. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देवविली. ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन. जोशी यांनी नूतन अध्यक्ष, सेक्रेटरी व खजिनदार यांना पदक बहाल केले. त्यानंतर कर्नाटक उत्तर प्रांत अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या बेळगांव शाखेच्या स्वाती घोडेकर तसेच मावळते अध्यक्ष विनायक घोडेकर, सेक्रेटरी मालतेश पाटील व खजिनदार रामचंद्र तिगडी यांचा सपत्नीक शाल, पुष्गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रांताध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नूतन अध्यक्ष विनायक मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या राष्ट्रप्रेमी नागरिकांना भारत विकास परिषदेशी जोडण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना पंडीत नंदन हेर्लेकर म्हणाले, माझ्या शिष्याने भारत विकास परिषदेसारख्या राष्ट्रीय संघटनेचा बेळगांव शाखाध्यक्ष व्हावं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. हा सन्मान संगीक्षेत्राचाही आहे असं मी मानतो. संगीताच्या माध्यमातून माझ्या शिष्याने जी सेवा केली आहे त्याला तोड नाही. मोरेंच्या क्षमता व योग्यता आपणास पूर्णपणे माहिती आहेत. ते आपला कार्यकाल परिषदेच्या ध्येयधोरणांनुसार हरतऱ्हेने संपूर्णपणे यशस्वी व संस्मरणीय करतील याची मला पूर्ण खात्री आहे, असे सांगितले.
यावेळी त्यांनी सर्व नविन पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक सदिच्छा दिल्या आणि यशस्वीतेचा कानमंत्रही दिला.
प्रमुख वक्ते डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी समारोप करताना, भारत विकास परिषदेच्या नि:स्वार्थ समाजसेवा, शिस्त व राष्ट्रकार्याचा यथार्थपणे गुणगौरव केला. ते म्हणाले, अनेक ठिकाणी पदग्रहण समारंभ आयोजिले जातात पण खऱ्या अर्थाने “दायित्वग्रहण” करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरीत्या निभावून सामाजिक बांधिलकी जपावी व राष्ट्र उभारणीत आपले संपूर्ण योगदान द्यावे. भारत विकास परिषदेची आपल्या राष्ट्राप्रतीची आत्मियता तसेच सम्पर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या परिषदेच्या पंचतत्त्वानुसार चालणारी परिषदेची वाटचाल खरोखर प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन केले. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांनी सर्वांना मनस्वी शुभेच्छा दिल्या.
परिषदेतर्फे प्रतिवर्षी अनेक सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये प्रामुख्याने विकलांग सहाय्यता, आरोग्य तपासणी, रक्तदान, ग्रामविकास, राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा, भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा, गुरू वंदना व छात्र अभिनंदन, दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान, शिष्यवृत्ती, संस्कार शिबिर आदिंचा समावेश आहे.
कार्यकारिणीमध्ये सल्लागार म्हणून व्ही. एन्. जोशी, नामाजी देशपांडे, डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी, पांडुरंग नायक, डाॅ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, सुहास सांगलीकर, व्ही. आर. गुडी, जयंत जोशी, श्रीनिवास शिवणगी, स्वाती घोडेकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारी संघ – विनायक घोडेकर, मालतेश पाटील, रामचंद्र तिगडी, कुमार पाटील, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, चंद्रशेखर इटी, कुबेर गणेशवाडी, अमर देसाई, नामदेव कोलेकर, जयंत कुलकर्णी, ॲड. सचिन जवळी, पी. जी. घाडी.
महिला प्रमुख म्हणून सुखद देशपांडे, प्रा. अरूणा नाईक
कार्यक्रम संयोजिका म्हणून जया नायक, शुभांगी मिराशी, रजनी गुर्जर, विद्या इटी, स्नेहा सांगलीकर, लक्ष्मी तिगडी, उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, रोहिणी पाटील, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, डॉ. प्रेमा ग्रामोपाध्ये, ॲड. बना कौजलगी, संगीता कुलकर्णी, योगिता हिरेमठ, अक्षता मोरे, ज्योती प्रभू, नंदिनी पाटील यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्राचार्या अरुणा नाईक यांनी केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. शेवटी सामूहिक राष्ट्रगीत झाले. यावेळी भारत विकास परिषदेचे सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.