बेळगाव : जिल्ह्यात आणि आंतरराज्य सीमेवरील चेकपोस्टवर अधिक सतर्कता ठेवून अवैध पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यात यावा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवारी आयोजित सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्याला गोवा आणि महाराष्ट्राची सीमा लागून असल्याने अवैध रोख रक्कम आणि वस्तूंची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगानेही याबाबत सातत्याने इशारा दिला आहे. त्यामुळे चेकपोस्टवर नेमलेल्या पथकांनी याबाबत सदैव दक्ष राहावे, असे ते म्हणाले.
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एफएसटी, व्हीएसटी पथकांनी आपापल्या मतदारसंघात सतत फिरणे बंधनकारक आहे. यावर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. पोलीस, उत्पादन शुल्क, वाणिज्य कर यासह विविध विभागांच्या पथकांनी गोदामे आणि इतर संशयास्पद ठिकाणी संयुक्तपणे अघोषित तपासणी करावी असे जिल्हाधिकारी म्हणाले.
चेकपोस्टवर तपासणी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे, अशा सूचना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिल्या.वाहनांच्या आतील भागाची देखील काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. वाहनांमध्ये फेरफार आढळल्यास त्याचीही तपासणी करावी, असेही ते म्हणाले. अत्यावश्यक सेवांमध्ये गुंतलेल्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टपालाने मतदान सक्तीचे करण्यासाठी पावले उचलावीत, असे ते म्हणाले.या बैठकीत बेळगाव शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारबानयांग, आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर शुभम शुक्ला, उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिकेचे आयुक्त पी.एन. लोकेश आणि सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नोडल अधिकारी सहभागी झाले होते.