गतवर्षीच्या तुलनेत २० हजाराची वाढ
निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोन्या चांदीच्या वस्तूसह संसार उपयोगी साहित्याची खरेदी करतात. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने प्रति तोळा २० हजार रुपये वाढूनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे सराफ पेठेत चैतन्याची गुढी उभारली गेली. याशिवाय इतर वस्तूंची खरेदी करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना यंदा महागाईची झळ सोसावी लागली.
वर्षातील अत्यंत शुभ समजल्या जाणाऱ्या मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक सण आहे. या सणादिवशी नव्या वस्तू घरामध्ये आणण्याची परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे या काळामध्ये बाजारपेठांमध्ये उत्साही वातावरण दिसून आले.
वर्षाच्या पाडव्याला सोन्याचे दर प्रति तोळा ७१ हजार ७०० पर्यंत तर चांदीचे दर ७० हजार ५०० पर्यंत होते. यावर्षी सोन्याचा दर प्रति तोळा ७१ हजार ५०० तर चांदीचा प्रति किलो दर ८१ हजार रुपये होता. तरीही खरेदी करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले. दिवसेदिवस महागाईमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. ऑटोमोबाईलमध्ये दुचाकी व चारचाकीला मागणी वाढली असून २०२३ च्या तुलनेत पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याचे त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. गुढीपाडव्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूसह नवीन खरेदीचा मुहूर्त यावेळी साधला. अनेक दूरचित्रवाणी संच, मोबाईल, फ्रिज, कुलर कंपन्यांनी सवलती, स्कीम जाहीर केल्याने खरेदीला प्रतिसाद मिळाला.
——————————————————————-
भांडी दुकानात गर्दी
पाडव्याच्या निमित्ताने संसार उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी भांड्याच्या दुकानांमध्ये दिवसभर गर्दी दिसून आली. यावेळी तांब्याच्या भांड्यांची चांगली खरेदी झाल्याचे व्यवसायिक दयानंद कोठीवाले यांनी सांगितले.
——————————————————————-
‘काही क्षेत्रामध्ये अत्यंत चांगले वातावरण असून मोठी उलाढाल झाली. गेल्या दोन वर्षांनंतर हा अत्यंत चांगला योग आल्याचे म्हणावे लागेल. सध्या दुचाकी व चारचाकी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले होते. सोन्या-चांदीचे दर वाढूनही खरेदी-विक्री समाधानकारक झाली.
– रवींद्र शेट्टी, सराफ व्यवसायिक, निपाणी