गुढीपाडव्याच्या दिवशी विरारमध्ये धक्कादायक घटना
मुंबई : विरारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारमध्ये एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी विरारच्या पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी उतरलेल्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सकाळच्या सुमारास एसटीपी प्लांट साफ करण्यासाठी कामगार उतरले होते, मात्र या कामगारांचा टाकीतच गुदमरून झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती अर्नाळा पोलीस आणि वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी हे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन जवानांनी ऑक्सीजन सिलेंडरचा वापर करून पाण्याच्या टाकीतून आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. त्यानंतर एकाचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेत शुभम पारकर (28) निखिल घाटाळ (24) सागर तेंडुलकर (29) आणि अमोल घाटाळ अशी मृत कामगारांची नावे आहेत. पॉलीकॅप नावाच्या कंपनीमार्फत या एसटीपी प्लांटच्या साफसफाईचे काम केले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अर्नाळा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. आज मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी ही घटना घडल्याने मयतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.