बेळगाव : बेळगाव शहर आणि जिल्ह्यात मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान श्रद्धाभक्तीने जल्लोषात साजरा करण्यात आला. बेळगावात पवित्र रमजान सणाचा एक भाग म्हणून हजारो मुस्लिम बांधवानी गुरुवारी शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली. बेळगाव जिल्ह्यात मुस्लिमांनी गुरुवारी पवित्र ईद-उल-फित्र उत्साहात साजरी केली. मुस्लिमांनी महिनाभर रोजा पाळून उपवास केला. अन्नपाण्याशिवाय सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. अल्लाहचे स्मरण केवळ उपवास (रोजा) करूनच होत नाही तर दान (जकात) नमाज, कुराण पठण, तरावीह याद्वारे देखील केले जाते. गुरुवारी सकाळपासूनच रमजानच्या दिवशी मुस्लिम भाविकांनी स्वच्छ कपडे परिधान करून मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा केली. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील ईदगाह मैदानावर हजारो लोकांनी सामूहिक नमाज अदा केली. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेद विसरून सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन सणाच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांनी नवीन कपडे परिधान करून रमजान सणाचा जल्लोष केला.मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती जोहर यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक प्रार्थना करण्यात आली. हाफिज अब्दुल रझाक मोमीन यांनी नमाज पठण केले, नइम खतीब खुत्बा यांनी अल्लाहविषयी उपदेश केला. यावेळी मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती जोहर यांनी समाजातील सर्वांसोबत राहावे. केवळ या महिन्यात इस्लामचे विधी पाळणे पुरेसे नाही; वर्षभर त्यांचे अनुसरण करा आणि सर्वशक्तिमान अल्लाहचा आशीर्वाद घ्या. तरच आमचे जीवन सार्थक होईल, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अंजुमन मैदानावर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे माजी आमदार फिरोज सेठ, विद्यमान आमदार राजू सेठ यांच्यासह विविध मान्यवरांनी एकमेकांना सणाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. त्याचप्रमाणे बेळगावच्या हद्दीतील विविध मशिदी आणि ईदगाहांमध्ये मुस्लिम समाजाने सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार राजू सेठ यांनी सर्व मुस्लिम भाविकांना ईद-उल-फित्र (रमजान सण) च्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी एकत्र राहून शांततेत रहावे, असे सांगितले. माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले, ईद-उल-फित्र हे वर्ष सर्वांना चांगले जावो, अल्लाह सर्वांचे भले करो. यावेळी हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.