बेळगाव : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरी करण्यात आली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक महेश हगीदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर वक्ते इंद्रजीत मोरे, शैला पाटील, कमल हलगेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, बी. जी. पाटील उपस्थित होते. शाळेचे संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांनी आंबेडकरांना वंदनपर गीत सादर केले. त्यांना नारायण गणाचारी यांनी तबला साथ दिली. प्रमुख पाहुणे महेश हगीदळे यांनी महामानव आंबेडकरांचा जीवन परामर्श आपल्या मनोगतात व्यक्त केला. बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पण, ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर शैला पाटील यांनी ‘संविधानाची ताकद’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. संविधानमध्ये राष्ट्र हाच शब्द वापरला आहे, घटना असावी का? संविधानाची तत्वे कोणती?आपण काय सामान्य नागरिक? या सर्व प्रश्नांची उत्तरे
कार्यक्रमाच्या वक्त्या शैला पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.संविधानांतर्गत प्रस्तावना, त्याच्या निर्मिती मागचा हेतू,प्रस्तावनेचा अर्थ, यात आलेल्या समानता, लोकशाही,समता, बंधुता या शब्दांचा सोप्या शब्दात अर्थ कार्यक्रमाच्या वक्त्या कमल हलगेकर यांनी आपल्या मनोगतात मांडला. घटनेची आज का गरज आहे ?, प्रस्तावनेतील धर्म निरपेक्षता, त्याचा अर्थ, धार्मिक स्वातंत्र्य, विचारांचे स्वातंत्र्य या मुद्यांवर शाळेतील समाज विषय शिक्षक इंद्रजीत मोरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रस्तावना सादर केली.
कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी, शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांनी केले.