बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहून बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठबळ देऊन निवडून आणा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी मराठा मंदिर येथे मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
यावेळी बोलताना मनोहर किणेकर म्हणाले की, निवडणूका आल्या की राष्ट्रीय पक्षांना मराठी भाषा, मराठी भाषिक आणि भगवा आठवतो. याची प्रत्येकाने नोंद घेऊन समितीच्या पाठीशी उभे राहून आपली ताकद निर्माण करणे गरजेचे बनले आहे. दोन्ही मतदारसंघातील राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबाबत नाराजीचा सूर आहे. याचा आपण लाभ घेत समिती उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
रणजित चव्हाण पाटील यांनी मध्यवर्ती समितीने केलेल्या सूचनेनुसार घटक समित्यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मध्यवर्ती समितीच्या प्रत्येक सभासदाने सक्रिय होऊन प्रचारात भाग घ्यावा. सर्वच ठिकाणी समितीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगितले.
यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खजिनदार प्रकाश मरगाळे, आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, रमेश धबाले, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बेळगाव मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील व कारवार मतदारसंघातील निरंजन सरदेसाई यांचा मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व बी. ओ. येतोजी यांनी सत्कार केला. बैठकीला मालोजी अष्टेकर, एम. जी. पाटील, विकास कलघटगी, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, बी. एम. पाटील, गोपाळ पाटील, अजित पाटील, सदानंद पाटील, रामचंद्र गावकर आदी मध्यवर्तीचे सदस्य उपस्थित होते.