पंतप्रधान मोदींचा सवाल; म्हैसूर येथील मेळाव्यात काँग्रेसवर घणाघात
बंगळूर : काँग्रेसवर थेट हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात भारत माता की जय म्हणायला परवानगी मागायची का, असा सवाल केला. देशात सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी दिवसे दिवस तापत असताना प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा गृह मतदारसंघ म्हैसूरमध्ये भाजप – धजद युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला.
म्हैसूर येथील महाराजा कॉलेज ग्राउंडवर आयोजित मेळाव्याला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी गुलबर्गा येथील मेळाव्यात बोलत होते. भाषणापूर्वी मंचावर असलेले एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची परवानगी घेतली आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. यावरून वाद झाला होता. म्हैसूर येथील मेळाव्यात मोदींनी याचा उल्लेख केला.
‘काँग्रेसकडे देशाला विकण्यासाठी, तोडण्यासाठी आणि कमकुवत करण्याच्या वाईट कल्पना आहेत. ते अजूनही सुरूच आहे. कलम ३७० बाबत राजस्थानात बोलण्याची काय गरज आहे, असा सवाल एआयसीसी अध्यक्षांनी केला. काश्मीरचा उर्वरित राज्याशी काय संबंध, असा प्रश्न ते विचारतात. कर्नाटकातील लोकही त्याचे साक्षीदार होते. भारताविरोधात बोलणाऱ्यांना काँग्रेस बक्षीस देईल, असे ते म्हणाले.
भारताच्या विरोधकाना काँग्रेस निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देते. काँग्रेसच्या निवडणूक मेळाव्यात एक व्यक्ती म्हणाली, ‘भारत माता की जय’. त्यासाठी त्यांनी मंचावरील नेत्यांची परवानगी घेतली होती. भारत माताकी जय म्हणण्याची परवानगी मागण्याच्या पातळीवर आपण झुकलो आहोत का, असा सवाल करत मोदींनी लक्ष्मण सवदी यांचे नाव घेण्यास नकार दिला.
अशा काँग्रेसला देश माफ करेल का? अशा काँग्रेसला कर्नाटक माफ करणार का? अशा काँग्रेसला म्हैसूरची जनता माफ करणार का? सुरुवातीला त्यांनी वंदे मातरंमला विरोध केला. आता भारत माता की जय म्हणायला त्याना लाज वाटते. काँग्रेसच्या पतनाचा हा कळस आहे. आज काँग्रेस पक्ष सत्तेसाठी आगीशी खेळत आहे.
पण, देशाची दिशा बघा, दुसरीकडे काँग्रेसचे शब्द बघा. आज जगात भारताचे नाव अभिमानाने घेतले जात नाही का? पण काँग्रेसवाले परदेशात जाऊन देशाला पायदळी तुडवण्याचे काम करत आहेत. देश आज आपल्या विरोधकांना सर्व प्रकारची उत्तरे देतो. काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकसाठी साक्षीदार मागितले. देशात दहशतवादासाठी बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या राजकीय शाखेशी काँग्रेस हातमिळवणी करत असल्याची टीका मोदींनी केली.
कर्नाटकात तुष्टीकरण सुरू आहे. सणांवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. धार्मिक ध्वज खाली घेतले जात आहेत. व्होटबँकेचा खेळ खेळणाऱ्या या लोकांना सशक्त करायचे का? असे त्यांनी विचारले.
म्हैसूर ही सांस्कृतिक राजधानी आहे. २२ जानेवारीला अयोध्येत ५०० वर्षांचे स्वप्न साकार झाले. यामुळे संपूर्ण देश एकवटला. मात्र, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या लोकांनी राम मंदिरासारख्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले. इंडिया मैत्रीचे नेते सनातनला संपवण्याची भाषा करत आहेत. हिंदू धर्माची शक्ती नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, जोपर्यंत मोदी आहेत, जोपर्यंत तुमचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत हा द्वेष यशस्वी होणार नाही. ही हमी असल्याचे मोदी म्हणाले.
२०२४ ची निवडणूक, ही पुढील पाच वर्षांची निवडणूक नसून २०४७ ची निवडणूक आहे. म्हणूनच मी मोदी, प्रत्येक क्षण तुमच्या नावासाठी, प्रत्येक क्षण देशासाठी काम करेन. माझे दहा वर्षाचे रिपोर्ट कार्ड तुमच्या समोर आहे. माझ्या सर्व घोषणा पुढील पाच वर्षांपर्यंत वैध असतील, असे मोदी म्हणाले.