सांबरा : निलजी (ता. बेळगाव) येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्रीराम वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ व श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने मंगळवार दि. १६ एप्रिलपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवर्य हभप वै. आप्पासाहेब तात्यासाहेब वासकर महाराज व हभप वै. बाळाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७.०५ वाजता ध्वजवंदन, ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १०:३० ते १२:३० भजन व कीर्तन निरूपण, दुपारी ४ ते सायंकाळी ५:३० हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन व रात्री ८ ते १० कीर्तन निरूपण व रात्री अकरानंतर जागर भजन होणार आहे. मंगळवार दि. १६ रोजी सायंकाळी ६ वाजता हभप ज्योतिबा खाचू चौगुले महाराज अलतगा यांचे प्रवचन तर रात्री आठ वाजता हभप बाळकृष्ण विठ्ठल मुळे महाराज सांगली यांच्या कीर्तन निरूपणाचा कार्यक्रम होणार आहे. दि. १७ रोजी सायंकाळी ६ वाजता हभप लव महाराज नार्वेकर शहापूर यांचे प्रवचन तर रात्री आठ वाजता हभप सोपानकाका काळे महाराज सातारा यांच्या कीर्तन निरूपणाचा कार्यक्रम होणार आहे. दि. १८ रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत हभप सोपानकाका काळे महाराज सातारा यांचा काला कीर्तनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ वाजता दिंडी व त्यानंतर महाप्रसाद वाटप होऊन पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी वारकरी व नागरिकांनी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.