पाच हजारहून अधिक भाविकांनी इंगळ खेळून फेडला नवस
बोरगाव (सुशांत किल्लेदार) : बिदरळ्ळी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस बुधवार दिनांक 13 एप्रिलपासून प्रारंभ झाला असून गुरुवार दि.14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. मुख्य दिवशी इंगळ खेळला जातो. यावेळी हर हर महादेवच्या गजरात सुमारे पाच हजारांहून अधिक भाविकांनी आपला नवस पूर्ण केला.
दि. 13 रोजी दंडवत, महाअभिषेक, बिल्वाचरण अभिषेक, आंबील कलश मिरवणूकसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज पहाटे सर्व भक्तानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ओल्या लाकडापासून तयार केलेल्या इंगळात आपला नवस फेडण्यासाठी इंगळ खेळले. त्यानंतर आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. खारीक व खोबऱ्याची उधळण करीत सुवाद्य मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली. पालखी मिरवणुकीनंतर उपस्थित भक्तांनी सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास भव्य जंगी कुस्त्या पार पडल्या. यावेळी महाराष्ट्रसह कर्नाटकातील व परिसरातील कुस्ती पैलवान व कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा काळात कोणतीही गडबड होऊ नये यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते. ग्रामपंचायतीतर्फे गावात पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेत पारंपरिक कलावाद्यांना प्राधान्य देऊन आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. ही परंपरा आजही येथील नागरिक व युवक वर्ग पुढे नेत आहेत. हे सर्वांसाठी आदर्श ठरत आहे. गाव लहान असले तरी संस्कार व संस्कृतीला महत्त्व देणारे गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. अशा गावची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा ही सर्वधर्मीयांचे प्रतीक आहे.