बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जण रिंगणात राहिले आहेत. बेळगावची खरी लढत जरी काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर विरुद्ध भाजपचे जगदीश शेट्टर यांच्यात असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्याकडे देखील लक्ष असणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या आठ जणांनी सोमवारी (दि. 22) आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता रणांगणात 13 जण उरले असून यामध्ये प्रामुख्याने भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामगिरीकडेही लोकांचे लक्ष असणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून आठ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये हणमंत नागनूर, ईश्वर चिकनरगुंड, भारती निरलकेरी, सागर पाटील, इस्माईल मगदूम, महांतेश निर्वाणी आणि महांतेश गौडर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. लोकसभा मतदारसंघात भाजपचे जगदीश शेट्टर, काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील यांच्यासह उत्तम प्रजातीय पक्षाचे मल्लाप्पा चौगुला, कर्नाटक राष्ट्र समितीचे बसप्पा कुंभार, बहुजन समाज पक्षाचे अशोक अप्पुगोळ, अखिल भारतीय हिंदू महासभेचे विजय मेत्राणी, एसयुसीआयसीचे लक्ष्मण जडगण्णावर, अपक्ष रवी पडसलगी, पुंडलिक इटनाळ, अशोक हंजी, नितीन महाडगुड, अश्फाक उस्ताद यांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.