बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त “आम्ही वाचतो” हा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात बेळगाव आणि परिसरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या चर्चेत ‘आम्ही वाचतो’ उपक्रमाला चळवळीचे स्वरूप यावे असा सूर उमटला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ विनोद गायकवाड होते. तसेच सचिव लता पाटील व नूतन चार्टर्ड अकाउंटंट राजू कुट्रे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाची संकल्पना सांगितली. “मोबाईलच्या मागे लागलेला तरुण वर्ग वाचन विसरला आहे अशी तक्रार होत असली तरीसुद्धा अनेक विद्यार्थी चांगले वाचतात असे आमचे निरीक्षण असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना बोलते केले.
यावेळी बोलताना नवीजन कांबळे यांनी आज “नवीन माध्यमे वाचनासाठी उपलब्ध आहेत. आई-वडील जन्म देतात, पुस्तके जीवन घडवितात ,लहान वयात आंबेडकरना कृष्णराव अर्जुन केळुस्करांनी आपण लिहिलेले बुद्ध चरित्र दिले आणि आंबेडकरांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली . असे सांगितले. “आम्ही गडबड, गोंधळ, गोंगाटातही वाचतो. निवांत शांत वातावरण खेड्यापाड्यात लाभत नाही असे मत सदलग्याच्या पूजा कांबळे यांनी मांडले. संत साहित्याच वाचन जीवनात लाभदायक ठरल्याची ग्वाही गिरीश जोशी यांनी दिली. तर पुस्तकामुळे नवीन नाती निर्माण होतात त्यातील पवित्र कळते असे अर्चना पाटील म्हणाल्या.
लक्ष्मी जाधव यांनी अन्सार शेख या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन नवी प्रेरणा देऊन गेले असे सांगितले. सलोनी पाटील यांनी आपल्या उद्बोधक भाषणात वृत्तपत्राचे वाचन, इतर भाषेतील साहित्याचे वाचन उपकारक ठरते असे सांगितले. स्वराली बिर्जे यांनी मोबाईलचा योग्य वापर केला तर आपल्याला तेथेही वाचन करता येते असा युक्तिवाद केला. नेहा पाटील या चोरल्याहून आलेल्या मुलीने वडिलांनी मला वाचण्याची प्रेरणा दिली असे सांगितले. चैतन्य हलगे करांनी वाचनाची पद्धती व प्रेरणा यावर प्रकाश टाकला. प्रा. वर्षा कुलकर्णी, प्रा. महादेव खोत, डॉ. मनीषा नेसरकर, अनंत लाड, किशोर काकडे यांनीही आपले विचार मांडले.
अनंत लाड यांच्या नातीनी टोरंटोहून ऑनलाईनवर आपण अनेक पुस्तके वाचत असल्याची माहिती दिली. यावेळी सीए परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झालेल्या राजू कुट्रे यांचा वाचनालयाचे जेष्ठ संचालक ईश्वर मुचंडी यांच्या हस्ते व नेताजी जाधव, अनंत लाड यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी या उपक्रमात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अनेक भागातील प्राध्यापक, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते