बेळगाव : मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सभा आज मंगळवार दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजता महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे होणार आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली असून मराठी भाषिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जोरदार तयारीला सारेजण लागले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळविण्यासाठी पाटील यांनी मनोज जरांगे- आंदोलनाबरोबरच सभाही घेतल्या. त्याला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सभांनी तर नवा विक्रमच प्रस्थापित केला आहे. त्यामुळे बेळगावातही होणारी सभा यशस्वी होणार हे निश्चित आहे. सीमाभागातील मराठा बांधवांना एकत्रित करण्यासाठी या सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. येथील मराठी भाषिकांचे अनेक प्रश्न रेंगाळत आहेत. त्याला वाचा फोडण्यासाठी जरांगे-पाटील हे बेळगावात दाखल होत आहेत.
सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या अनेक वर्षांपासून येथे खितपत पडले आहेत. त्यामुळे आता आर या पारची लढाई करण्यासाठी एकजुटीने मराठी भाषिकांनी जरांगे-पाटील यांची सभा आयोजित केली आहे. या सभेला जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकवटला जाणार आहे. त्यामुळे ही सभा भव्य प्रमाणात पार पडणार हे निश्चित आहे.
सीमाभागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज, शहर म. ए. समिती, तालुका म. ए. समिती, युवा म. ए. समिती, तालुका युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.