बेळगाव : लहान मुलांपासून ते दहावीच्या मुला-मुलींसाठी एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन बुधवार दि. 15.5.24 रोजी येथील न्यू उदय भवनच्या सभागृहात करण्यात आले.
प्रारंभी नोंदणी, न्याहारी झाल्यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सौ. सोनाली सरनोबत अन्य कार्यकर्त्या भगिनी, किशोर काकडे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेची पूजा करुन शिबीराचा विधीवत प्रारंभ करण्यात आला.
डॉ. सौ. सोनाली सरनोबत यांनी भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे स्वागत व कौतुक करीत शिबिराचा उद्देश सांगितला. हिंदु धर्म, पूजा विधी विषयी माहिती दिली. पहिल्या सत्रात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडेंनी देश की रक्षा हम करेंगे असे सांगत, आपला हिंदु धर्म,वाचन, सुट्टीत घरातल्यांना मदत करणे विषयी माहिती देत देशभक्तीपर गाणी शिकविली. दुसऱ्या सत्रात स्व-संरक्षण-सेल्फ डिफेन्स याविषयी श्री. यम्मी महारुद्र यांनी मुलांना माहिती देत महत्वाची प्रात्यक्षिके करुन घेतली. तर भोजनापूर्वीच्या सत्रात श्री. निमाई पाटील यांनी जीवनात योगाचे महत्त्व सांगत योगाभ्यास करुन घेतला.
भोजनोपरांतच्या सत्रात सौ.सुनिता पाटणकरांनी प्रबोधनपर गोष्टी सांगून कथाकथनाचे महत्व सांगितले. नंतरच्या शेवटच्या सत्रात सौ. सुचिता पाटील यांनी आर्ट व क्राफ्ट विषयी मुलांना छानशी माहिती दिली.
समारोप समारंभात सकाळी घेतलेल्या खेळातील विजयी मुला-मुलींना बक्षिसे देण्यात आली तर शिबिरात भाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र, हनुमान चालीसा पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली. भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया, वंदेमातरम्, जय भवानी जय शिवाजी, देश की रक्षा हम करेंगे अशा घोषणा देत शिबिरार्थिनी दिवसभर उत्साहात भाग घेत शिबिर यशस्वी केले. प्रतिष्ठानच्या सर्व भगिनी कार्यकर्त्या व कार्यकारिणीच्या सदस्या- नम्रता हुंदरे, कांचन चौगुले, गीता चौगुले, आशाराणी निंबाळकर, नीना काकतकर, विद्या सरनोबत, मंगल पाटील, चंद्रा चोपडे, दीपाली मलकारी, वृषाली मोरे व अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. दीपाली मालकरीजीनी सूत्रसंचालन केले.
सौ.राजश्री अजगावकरांनी विशेष सहयोग दिला.
Belgaum Varta Belgaum Varta