बिजगर्णी : कावळेवाडी गावाच्यावतीने बिजगर्णी गावचे सुपुत्र, बिजगर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा समिती हायस्कूलच्या प्रांगणात दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी होते. तसेच व्यासपीठावर माजी प्राचार्य आनंद मेणसे, मालोजीराव अष्टेकर, गोपाळ गावडा, डी. एन. मिसाळे, मनोहर बेळगावकर, आप्पा जाधव, जोतिबा मोरे, विठ्ठल मोरे, धनाजी कांबळे, एम. एम. जाधव, एस. एम. जाधव, पी. एस. भाष्कळ, वाय. एच. पाटील, नामदेव मोरे, यल्लापा बेळगावकर, प्रा. रमेश गोडसे, पी. आर. गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यांना तबला व हार्मोनियमची साथ शंकर चौगले व अर्जुन चौगले यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन झाले.
उपस्थित पाहुण्यांचा परिचय आयोजन समितीचे सचिव वाय. पी. नाईक यांनी करून दिला. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत संस्था उपाध्यक्ष एस. एम. जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन केले. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष पी. पी. बेळगावकर यांनी प्रास्ताविक करून सत्कारमूर्ती मोरे यांच्या कार्याचा आढावा घेतला.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे हस्ते उत्सवमूर्ती एस. आर. मोरे यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून नागरी सत्कार करण्यात आला. मुख्य सत्कारानंतर माजी विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ तसेच कुटुंबियांकडून भेटवस्तू देऊन मोरे यांना शिक्षक सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रा.आनंद मेणसे यांनी मोरे यांच्या यशस्वी कारकीर्दचा सखोल आढावा घेतला. शाळा जिवंत ठेवणं, जगवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. शिक्षणातून संस्कारक्षम पिढी घडविता येते ते कार्य मोरे यांनी प्रामाणिकपणे केले म्हणून आज शेकडो विद्यार्थी उपस्थित आहेत, हीच खरी कमाई आहे, असे विचार प्रा. मेणसे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ पत्रकार गोपाळ गावडा यांनी सरांना शुभेच्छा दिल्या. माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी शिक्षण क्षेत्रातील योगदान कथन करुन शिक्षकी सेवेतील आठवणी जाग्या केल्या. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. डी. एन. मिसाळे, बी. बी. देसाई, यांनीही मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
शिक्षण घेऊन समाजाची सेवा करणं हे पुण्यकर्म आहे. ग्रामीण भागात गुणवत्ता आहे. चिकाटी व जिद्दीने ध्येय गाठता येते. सत्तर वर्षांपूर्वी कोणत्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. वंचित व मध्येच शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी यांनी शिक्षण पूर्ण करायला स्फूर्ती दिली, बालवयात आईवडील यांनी चांगले संस्कार केले म्हणून आज 81 वर्षात यशस्वी झालो. जिथं बालपण गेलं, खेळलो, बागडलो झगडण्याची उर्मी मिळाली, त्या जन्मभूमीला कधी विसरू नका. शिक्षणामुळेच मान, प्रतिष्ठा मिळाली. पुस्तके वाचल्याने समाज, माणूस ओळखता आला. समाजाची बांधिलकी महत्वाची आहे. आयुष्य जगताना स्वाभिमानी रहा, परखडपणे मतं मांडत रहा. इतरांच्या सेवा करण्यास वेळ द्या, आर्थिक मदत करा. हाच माणुसकीचा धर्म आहे असे मौलिक विचार सत्काराला उत्तर देताना उत्सवमूर्ती एस. आर. मोरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी एस. आर. मोरे सरांचे विद्यार्थी, नातलग, श्रीवर्धन एस. मोरे, जयश्री सूर्यवंशी, गोविंद मिसाळे, वनश्री नायर, डॉ. अश्विनी मोरे, अशोक कांबळे, भाऊराव कणबरकर, यशवंत मोरे, मनोहर मोरे, आर. बी. देसाई, रमेश कांबळे, एन. एस. गाडेकर, मलापा सुकये, बबनराव जाधव, नाना पाटील, शिवाजी मंडोळकर, परशराम भास्कर तसेच बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवाडी, मंतुरगा (खानापूर) आदी गावातील असंख्य शिक्षणप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन के. आर. भाषकर यांनी केले.