“त्या” बँकेच्या “दिग्गुभाई” अध्यक्षाचे प्रताप थांबता थांबेना झालेत. भ्रष्टाचाराचा कळस गाठून लाखोंची भानगड करून देखील भस्मासुराचे पोट काही भरले नाही अशी गोष्ट आता समोर आली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेळगावमधील एका मठाच्या ठेवींवरती “त्या” बँकेच्या अध्यक्षाची वाईट नजर पडलेली आहे. कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष हा अमर नसतो याचा कदाचित या “दिग्गुभाईला” विसर पडलेला दिसतो. मठाच्या सध्याच्या संचालक मंडळाने वारंवार मागणी करून देखील अध्यक्षाने त्या मठाच्या ठेवी अडवून ठेवलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील कोणतेही सबळ कारण न देता “त्या” अध्यक्षाने स्वतःच्या हेकेखोरपणा व आडमुठेपणामुळे सदर मठाच्या ठेवी या मठाकडे सुपूर्द करण्यास टाळाटाळ चालवली आहे.
यासंदर्भात “बेळगाव वार्ता”च्या प्रतिनिधीने त्या मठाच्या अध्यक्षांशी संपर्क साधून वरील प्रकाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक माहिती समोर आली. सदर बँकेच्या अध्यक्षाकडे जेव्हा मठाच्या ठेवींबद्दल विचारणा केली असता मठाच्या अध्यक्षाला उडवाउडवीचीडीची उत्तरे देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. याला संतापून “त्या” मठाच्या अध्यक्षांनी त्या बँकेच्या अध्यक्षाला जाब देखील विचारला व येणाऱ्या काळात जर मठाच्या ठेवी परत केल्या नाहीत तर मठाच्या संचालक मंडळ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना घेऊन बँकेवर मोर्चा काढण्यात येण्याचे संकेत दिले आहेत. तसेच “त्या” बँकेच्या अध्यक्षाविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी “त्या” बँकेचा अध्यक्ष, मॅनेजर जबाबदार असतील असा इशारा मठाच्या अध्यक्षांनी दिला आहे.
(क्रमशः)