बेळगाव : बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील विश्वभारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच संगणक कक्षाचे उदघाटन व ईमारतीच्या नुतनीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.
शाळा बांधकाम समिती व विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे संचालक बी. बी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक पी. एम. बेळगावकर, माजी तालुका पंचायत सदस्य एन. के. नलावडे आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
बांधकाम समितीचे सदस्य विष्णू चांदिलकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. बांधकाम समितीचे सचिव पी. एम. बेळगावकर यांनी अहवाल सादर करून ईमारतीच्या नुतनीकरणाची योजना मांडली. कर्मचारी एन. एस. गाडेकर व आर. बी. देसाई यांनी सरस्वती पूजन केले. त्यानंतर बी. बी. देसाई यांनी फीत कापून संगणक कक्षाचे उद्घाटन केले. पी. एम. बेळगावकर, एन. के. नलावडे, माजी विद्यार्थी सातेरी चौगुले, ज्ञानेश्वर चौगुले, व्ही. एस. चांदिलकर, बाळकृष्ण नलावडे आदींच्या हस्ते संगणक पूजन करण्यात आले.
बी. बी. देसाई यांनी संगणकाचे महत्व विशद करून त्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली. आर. बी. देसाई, एन. के. नलावडे, सातेरी चौगुले यांचीही भाषणे झाली. यावेळी कांही माजी विद्यार्थ्यांनी गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमास अजय गाडेकर, पंकज देसाई, यशवंत चांदिलकर, ए. एस. होनगेकर, आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta