संजीवीनी फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्स दिनी मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान
बेळगाव : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजारपणात औषधोपचाराची गरज असते त्यावेळी त्यांना देवरूपी डॉक्टर ती गरज पूर्ण करत असतात, म्हणूनच त्यांना रुग्णांच्या आयुष्यातील दुसरा देव म्हणायला हरकत नाही. अनेकजण वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक तणावाखाली वावरताना दिसत आहेत अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांसमोर मोठी जबाबदारी आली असल्याचे मत रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले.
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त आयोजित मानसोपचार तज्ज्ञांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सीईओ मदन बामणे तसेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आली.
मदन बामणे यांनी प्रास्ताविक करत असताना संजीवीनी फौंडेशनच्या कार्याबद्दल माहिती देऊन राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून दरवर्षी वेगवेगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात येतो. यावेळी मानसोपचार तज्ज्ञांची निवड केल्याचे सांगितले व उपस्थित मान्यवर आणि सत्कारमूर्तींचे स्वागत केले.
त्यानंतर अविनाश पोतदार आणि आर. एम. चौगुले यांचे स्वागत शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
यानंतर डॉ. एस. एस. चाटे, डॉ. अँटोनियो कार्व्हलो आणि डॉ. विजयालक्ष्मी पुरद या मानसोपचार तज्ज्ञांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली.
यावेळी आर. एम. चौगुले यांचेही समयोचित भाषण झाले.
सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. सुरेखा पोटे यांनी करून दिला.
यावेळी उपस्थित डॉ. अनिल पोटे आणि डॉ. सुरेखा पोटे तसेच डॉ. अनिल सावळगी यांनाही डॉक्टर्स दिनानिमित्त स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सर्वच सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना संजीवीनीच्या वाटचालीची प्रशंसा केली व सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेताना मनोविकार बरा होण्यासाठी डॉक्टरांच्या उपचाराबरोबरच पुनर्वसन केंद्रांची गरज असते ते ओळखून संजीवीनी पुनर्वसन केंद्र सुरू केल्याचे सांगितले व उपस्थितांचे आभार मानले. आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी केले.