बेळगाव : येथील निवृत्त मुख्याध्यापक एल. एन. कंग्राळकर यांनी लिहिलेल्या “हेची माझे सुख” या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा गेल्या शनिवारी हॉटेल नेटिव्हच्या सभागृहात संपन्न झाला. शब्दशिवार प्रकाशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. सुभाष सुंठणकर हे होते.
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर इंद्रजीत घुले यांनी प्रास्ताविकात या पुस्तक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. प्रकाशकांच्या वतीने कंग्राळकर सरांचा शाल, पुष्पगुच्छ आणि आ. ह. साळुंखे विचारग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. प्रकाशिका सौ. इंदुमती जोंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कंग्राळकर यांचे शिक्षक म्हणून कार्य कौतुकास्पद आहे हे त्यांच्या जीवनावरून आमच्या लक्षात आले म्हणूनच त्यांच्या या जीवन ग्रंथाचा प्रकाशनाचा आम्ही निर्णय घेतला. असे त्या म्हणाल्या. अनिल आजगावकर यांनी कंग्राळकर सर हे शिक्षक म्हणून कसे श्रेष्ठ आहेत याचे आपल्या भाषणात कथन केले. कंग्राळकरांच्या पुस्तकाचा आढावा घेऊन अनंत लाड यांनी आत्मचरित्रामुळेच व्यक्ति कळतात. माणसाची ओळख होते. न होऊन अनेक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्या की समाज त्यांना विसरतो. त्यामुळे या चरित्र ग्रंथाला विशेष महत्त्व आहे”असे सांगून कंग्राळकर सर यांचे जीवन आदर्शवादी आहे एका ध्येयवादी शिक्षकाच्या जीवनाचा हा परिचय भावी पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल” असेही ते म्हणाले. गडहिंग्लजचे पक्षी मित्र आणि कंग्राळकर परिवाराचे जवळचे मित्र श्री. अनंत पाटील यांनी पुस्तकाचा आढावा घेत कंग्राळकर सरांच्या जीवनाचा परामर्श घेतला.
समारंभाध्यक्ष सुभाष सुंठणकर यांनी पूर्वी शाळा शिक्षकांच्या नावाने ओळखल्या जायच्या, कंग्राळकर सरांनी मराठीपण सतत जपले असून सीमा प्रश्ननी लाठीमार खाल्लेला आहे. त्यांचे हे कस्टमय जीवन व हे पुस्तक एक आदर्शवादी व ध्येयवादी आहे. असंख्य अडचणीतून पुढे जाण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे, असे ते म्हणाले. विवेक कंग्राळकर, विद्या तोपिनकट्टी आणि रेखा कंग्राळकर यांच्या हस्ते पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले.
सौ. विद्या तोपिनकट्टी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.