शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी
बेळगाव (वार्ता) : खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात डांबण्यात आलेल्या शिवभक्तांची मुक्तता करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान केल्यानंतर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमधील शिवभक्त धर्मवीर संभाजी चौकात जमले होते. बेळगाव पोलिसांनी या शिवभक्तांवर खुनाचा प्रयत्न, राजद्रोहासह अन्य कलमाखाली गुन्हे दाखल करून त्यांना कारागृहात डांबले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य कामगारवर्गाचा समावेश आहे. घरातील कर्त्या व्यक्तीलाच कारागृहात डांबण्यात आल्याने कुटुंबियांचे हाल होत आहेत. तसेच राजद्रोहासारखा गुन्हा दाखल करून शिवभक्तांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन शिवभक्तांची त्वरित मुक्तता करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.
याप्रसंगी रवींद्र जाधव, महेश टंकसाळी, विनय कोवाडकर, रमेश माळवी, प्रकाश हेब्बाजी यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.