बेळगाव : चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचे खासदार झाल्यानंतर प्रथमच बेळगावात आगमन झाले. काँग्रेस जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आपल्या वडिलांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालत असून संविधानानुसार आपण सर्व कामकाज करण्यावर भर देत आहोत. संविधान वाचविण्यासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू. ज्येष्ठ खासदारांचा सल्ला घेऊन आपल्या मतदार संघातील सर्व समस्या सोडविण्यासाठी अधिवेशनात सर्व मुद्दे मांडेन असे त्या म्हणाल्या. स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून चिकोडीला जिल्ह्याचा दर्जा देण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदारपदी निवडून आलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचे आज बेळगाव काँग्रेसच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जयश्री माळगी, बसवराज रोट्टी, मल्लेश चौगुले, आयेशा सनदी आदी उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी प्रियांका यांनी नागनूर रुद्राक्षी मठ भेट दिली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, राणी चन्नम्मा चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, बसवेश्वर सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान महापुरुषांच्या मूर्तींना हार अर्पण केला. याशिवाय पिरणवाडी येथे दर्गा भेट, संगोळी रायण्णा मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती आणि माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी आणि विद्यमान आमदार असिफ शेठ यांच्या घरी भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि येळ्ळूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष सतीश पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.