
बेळगाव : पशुबळी बंदीसाठी जनजागृती केल्यामुळे वडगावच्या ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रेत पशुबळी पूर्णपणे रोखण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया जागतिक प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली.
बेळगाव शहरात होणाऱ्या अनेक यात्रांपैकी मोठ्या प्रमाणात भरविल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेत यंदा प्रथमच पशुबळी प्रथा बंद करण्यात आली. यासंदर्भात आज दयानंद स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून जिल्हा प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
यावेळी बोलतांना दयानंद स्वामीजी म्हणाले की, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून वडगावच्या यात्रेत पशुबळी बंदीचा आदेश देण्यात आला, हे कौतुकास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या पशुबळी प्रथेवर यंदा प्रथमच बंदी घालण्यात आली. यामुळे येथील जत्रा आनंदात पार पडली. याचप्रमाणे आता उचगावच्या मळेकरणी देवस्थानात देखील पशुबळी बंदी करण्यात यावी. याठिकाणी दर मंगळवारी आणि शुक्रवारी होणारी पशुबळी प्रथा बंद करण्यात यावी, यावर कडक निर्बंध घालण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित उचगाव ग्रामपंचायत सदस्य यादव कांबळे म्हणाले की, हिंदू धर्माच्या संस्कृतीत पशुबळीला परवानगी नाही, कोणत्याही देवाला पशुबळी नको आहे. देवाच्या नावावर हजारो जनावरांचा बळी देण्यात येत असून हि प्रथा थांबविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी दयानंद स्वामीजी, एम. बी. तेरसे, ग्राम पंचायत सदस्य यादव कांबळे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta