Friday , November 22 2024
Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर

Spread the love

 

बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर विविध परवानगीसाठी सिंगल विंडो, रस्त्यांची दुरुस्ती, गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे, पाणपोईची व्यवस्था, मंडप परिसरातील स्वच्छता आदी विविध मागण्यांचे निवेदन आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील नोंदणीकृत सुमारे 357 गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असतो. या मंडळांना विविध सरकारी खात्यांची परवानगी सत्वर मिळावी यासाठी सिंगल विंडो अर्थात एक खिडकी प्रणाली अंमलात आणली जावी. जेणेकरून शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना संबंधित खात्यांची परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. जुनी महापालिका इमारत रिसालदार गल्ली, बेळगाव आणि महापालिका कार्यालय गोवावेस सर्कल या ठिकाणी उपलब्ध करावेत. मुसळधार पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर्स वापरले जावेत. महापालिकेने शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांचा परिसर स्वच्छ ठेवावा. हेस्कॉमने कोणताही अडथळा निर्माण होणार नाही किंवा धोका संभव होणार नाही या पद्धतीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांसाठी वीज वाहिन्यांची जोडणी करावी. तसेच शहर आणि उपनगरातील काळोख असणाऱ्या भागात योग्य दिवे (हेवीवॅट फोकस) बसवावेत.
वन खात्याने श्री गणेशोत्सव काळात रस्त्यात आडव्या येणाऱ्या, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडाच्या फांद्या हटवाव्यात. सार्वजनिक श्री गणेश मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी स्थानिकांसह परगावचे भाविक मोठ्या संख्येने बेळगावला येत असतात. तेंव्हा शहरात त्यांच्यासाठी फिरत्या स्वच्छतागृहाची मोबाईल टॉयलेट व्यवस्था केली जावी. त्याचप्रमाणे श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खुल्या असलेल्या गटारी बंदिस्त केल्या जाव्यात. परिवहन मंडळाने (केएसआरटीसी) आपली बससेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी. जेणेकरून ग्रामीण भागातून रात्री उशिरापर्यंत गणेश देखावे आणि मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांची चांगली सोय होईल. याखेरीज श्री गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत शहरातील हॉटेल्स, फूड कॉर्नर, टी स्टॉल वगैरे सर्व व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली जावी. श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी वनिता विद्यालय ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत प्रेक्षक गॅलरीची उभारणी केली जावी. ज्यामुळे जनतेला विशेष करून वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना कोणत्याही अडचणी विना एका जागी बसून विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटता येईल.
मूर्तिकारांच्या कार्यशाळेपासून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपापर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जावी. जेणेकरून सार्वजनिक श्री गणेश मूर्ती निर्विघ्नपणे मंडपापर्यंत घेऊन जाणे सुकर होईल. याव्यतिरिक्त हेस्कॉमने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरते मीटर्स देण्याच्या बाबतीत नुकसानभरपाई बंधपत्रची जी अट घातली आहे ती मागे घेतली जावी. कारण नुकसानभरपाई बंधपत्रानुसार विद्युत मीटरचे शुल्क गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या घरातील विद्युत मीटरवर हस्तांतरित केले जाईल जे अध्यक्षांच्या खाजगी कुटुंबासाठी ओझे होत आहे, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.

निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

निवेदन सादर करतेवेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्यकारी अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, उपाध्यक्ष सतीश गोरगोंडा, उपाध्यक्ष सागर पाटील, जनरल सेक्रेटरी महादेव पाटील, कार्यकारी सचिव आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *