बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकासमोर डॉ. बी. आर. आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले.
रेल्वे स्थानकासमोरील डॉ. बी. आर. आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे शिल्प बसवण्याच्या मागणीसाठी विविध दलित संघटनांनी कर्नाटक दलित संघर्ष समिती आणि रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकावर निदर्शने केली.
कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यावेळी बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि छत्र. शिवाजी महाराजांचे शिल्प तयार करून गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आहे. सदर शिल्प रेल्वेस्थानकासमोर बसविण्यासाठी अनेकवेळा मागणी करण्यात आली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजवर केवळ कारणे देऊन वेळकाढूपणा करण्यात येत असून याठिकाणी तातडीने शिल्प बसविण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज या महापुरुषांचे शौर्य भारत देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने ओळखले. अशा महापुरुषांचे शिल्प उभारण्यासाठी रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबाबत आंदोलकांनी यावेळी संताप व्यक्त केला. या आंदोलनात रमाकांत कोंडुसकर, रवी बस्तवाडकर, मनोज हितलमणी, संगीता कांबळे, आदींसह या आंदोलनात दलित संघर्ष समितीचे आणि श्रीराम सेना हहिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.