बेळगाव : बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारा रक्षाबंधन सण मराठा लाईट इन्फ्रन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये उत्साही वातावरणात पारंपरिक पद्धतीने पार पडला. यामध्ये सेंटर मधील अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते.
विविध सामाजिक संस्थांच्या महिला आणि शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रशिक्षण घेत असलेले अग्निविर, जवान तसेच अधिकारी यांना राखी बांधली. आपले घर सोडून देशाच्या विविध भागातून सेवा बजावण्यासाठी आलेल्या जवान आणि अधिकाऱ्यांना महिला आणि विद्यार्थिनींनी राखी बांधून आपुलकी आणि नात्याचे दर्शन घडवले. कुंकुमतीलक लावून आरती ओवाळून जवानांना राखी बांधण्यात आली त्यावेळी जवान आणि अधिकारी देखील भारावून गेले.
दरवर्षी मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो. बेळगाव शहरातील विद्यार्थिनी आणि सामाजिक संघटनांच्या महिला सदस्या जवानांना राखी बांधतात. रक्षा बंधन कार्यक्रम झाल्यावर जवानांनी मातृभूमीचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करण्याची शपथ घेतली. मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी रक्षाबंधनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.