बेळगाव : म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच मुडाच्या जमीन वाटपासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने राज्यात खळबळ माजवली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चौकशीला राज्यपालांनी अनुमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यभरात आंदोलन छेडले. यासाठी बेळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या पाठबळावर राज्यपालांकडून राज्यातील काँग्रेस सरकारवर अन्याय होत आहे. असे म्हणणे मांडून केंद्र सरकारचा देखील निषेध करण्यात आला. राज्यपाल हे केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनले असल्याचा आरोप करून तशा घोषणा देण्यात आल्या.
मोर्चाचे नेतृत्व आमदार असिफ (राजू) सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांनी केले होते. यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.