बेळगाव : बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग होता. त्यावेळी १९२४ मध्ये महात्मा गांधी यांनी बेळगावात अधिवेशनाचे अध्यक्षपद स्वीकारले होते. महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे, असे सांगत अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेळगावच्या मराठीपणाची कबुली दिली आहे. मुंबईत मंगळवारी (दि. २०) प्रदेश काँग्रेसकडून राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार यांनाही बोलावण्यात आले होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी मनोगत व्यक्त केले. खर्गे यांनी भाषणात बेळगावचा उल्लेख करताना बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग होता. त्यावेळी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात १९२४ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. आज बेळगाव कर्नाटकाचा हिस्सा असला तरी महाराष्ट्राला राजकीय, सामाजिक चळवळींचा मोठा इतिहास आहे, असे सांगितले. शिवाय, बेळगाव महाराष्ट्राचा भाग होता, असे सांगून येथील मराठीपणाची कबुली दिली आहे.