बेळगाव : बेंगलोरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात छेडलेल्या आंदोलन प्रकरणी माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांना खडेबाजार पोलीस स्थानकातील पाच गुन्ह्यांमध्ये तर मयूर बसरीकट्टी व राधेश शहापूरकर यांना दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशन कालावधीत बेंगलोरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बेळगावात आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळी माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांच्यावर देखील खडेबाजार पोलीस स्थानकात नोंदविण्यात आले होते.
बेळगाव जेएमएफसी तिसऱ्या न्यायालयांमध्ये आज सोमवारी झालेल्या सुनावणीत खडेबाजार पोलीस स्थानकातील गुन्हा क्र. 88, 89, 90, 91 आणि 92 मध्ये, त्याचप्रमाणे आठव्या जिल्हा सत्र न्यायालयाने खडेबाजार पोलीस स्थानकातील गुन्हा क्र. 88 व 90 मध्ये माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, मयूर बसरीकट्टी आणि राधेश शहापूरकर यांना जामीन मंजूर केला आहे.
25 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्याच रकमेचा एक जामीन, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही, पोलीस तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करेन आणि प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहीन या अटींवर चौघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांनी स्वतः न्यायालयात हजर होऊन जामीन स्वीकारला. कोर्टमध्ये माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी उपस्थित होते.
उपरोक्त सर्वांच्यावतीने वकील ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. संतोष बाळनाईक, ॲड. चिंदबर होनगेकर आणि ॲड. एस. बी. पट्टण यांनी कामकाज पाहिले.