
“इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीप्रमाणे गेल्या 31 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे प्रशस्त अशा स्वतःच्या इमारतीत उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी साडेदहा वाजता स्थलांतर होत आहे त्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा घेण्यात आलेला आढावा….
1990 च्या आसपास विद्यानगर अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या काही तरुण मंडळींनी धनश्री साप्ताहिक बचत निधी नावाचा एक फंड सुरू केला. समाजसेवेच्या हेतूने सुरू झालेल्या या फंडाला गणेश मंडळ तसेच विद्यानगर वासियांची चांगली साथ लाभल्याने तो जोमाने चालू लागला, यानंतर निवृत्त बँक अधिकारी के. एस. खासनिस यांच्या मार्गदर्शनानुसार धनश्री साप्ताहिक बचत निधीचे रूपांतर दि. धनश्री को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये करावयाचे ठरले. विद्यानगर भागातील ज्येष्ठ पंचमंडळींनी या कल्पनेला खंबीर पाठिंबा दर्शविला आणि जे. व्ही. खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली धनश्री सोसायटी 1993 साली अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर स्थापन झाली. व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक, प्रापंचिक, आवडीनिवडीसाठी तसेच त्यांना छोटे-मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी पैशांची गरज भासायची पण, पत नसलेल्यांना बँका जवळ करीत नसत त्यामुळे ह्या वर्गाला निधीसाठी मिळेल त्या व्याजदराने सावकारी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नव्हता. सर्वसामान्यांची या दुष्टचक्रातून, सावकारी विळख्यातून, सुटका व्हावी या हेतूनच धनश्री सोसायटीचा जन्म झाला होता. सुरुवातीला अगदी लहान म्हणजे पाच दहा हजारांची कर्जे उपलब्ध झाल्याने अनेकांना मदत झाली. व वसुलीचा जाचक तगदा न लावल्याने अनेक संसार उध्वस्त होण्यापासून वाचले. अशा मदतीमुळे सावरलेले अनेक यशस्वी उद्योजक आज संस्थेचे भक्कम आधारस्तंभ बनले आहेत. कोणत्याही आर्थिक संस्थेला याहून अभिमानाची गोष्ट ती कोणती असणार. सर्वसामान्य गरजूंना, तळागाळातील व्यक्तींना सोबत घेऊन वाटचाल केल्याने संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत गेली, शिवाय तिचा पाया देखील बळकट व भरभक्कम झाला. धनश्रीची ही दमदार वाटचाल भावल्यामुळेच ठेवीदारांचेही संस्थेशी अतूट असं विश्वासाचं नातं निर्माण झालं. त्यानंतर संस्थेने थोडी थोडी वाढवत छोटी खाणी स्वतःची तीन मजली इमारत उभी केली. याच इमारतीमध्ये गेल्या 31 वर्षापासून कारभार चालू आहे. याच वर्षी संस्थेने टिळक चौक बेळगाव येथे पहिली शाखा काढली. आणि आता संस्थेने आपल्या जुन्या इमारतीच्या अगदी बाजूलाच प्रशस्त अशी स्वतःची बिल्डिंग खरेदी करून त्या बिल्डिंगमध्ये हायटेक ऑफिस बनवले आहे. वाजवी दरात, जलद कर्जे, ठेवीवर आकर्षक व्याजदर, गुंतवणुकीचे अनेक पर्याय, विनम्र व तत्पर ग्राहक सेवा, इत्यादीमुळे सहकारातील एक अग्रेसर व नामांकित पतसंस्था म्हणून धनश्री सोसायटीकडे पाहिले जाते. स्वतःची प्रगती साधत समाजातील लोकांचा विश्वास संपादन करून लोकांची सेवा करणारी एक उत्तम सहकारी संस्था म्हणून संस्थेने नाव कमावले आहे, संस्थेला कायम ऑडिट वर्ग अ नामांकन मिळाले आहे. अर्थकारणाबरोबरच संस्थेने समाजकारणही जपले आहे. संस्था प्रत्येक वर्षी सभासदांच्या गुणी मुला- मुलींचा गौरव करते. पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा गौरव, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, वाचनालयाला पुस्तके देणे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर, कोरोना काळात गरीब कुटुंबांना शिधावाटप, त्याचबरोबर समाजातील इतर संघ संस्थांना सोसायटीमार्फत अर्थसाह्य केले जाते. संस्थेकडे 51 लाख इतके भागमंडल आहे, तर 5 कोटी 71 लाखाचा निधी, संस्थेकडे 38 कोटी 52 लाखाच्या ठेवी आहेत. संस्थेने आजपर्यंत 37 कोटी 76 लाख इतके कर्जवाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक 7 कोटी 11 लाख इतकी आहे. संस्थेला यावर्षी निव्वळ नफा 1 कोटी 17 लाख इतका झाला आहे. शिवाय सतत 20% लाभांश देणारी ही पहिली पतसंस्था आहे. संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून संस्थेने उत्तम प्रगती साधली आहे. संस्थेचे चेअरमन शिवाजी पावले, व्हाईस चेअरमन नितीन येतोजी, संचालक कॅप्टन जी. जी. कानडीकर, श्री. जगदीश एन्. बिर्जे, श्री. अर्जुन सी. कोलकार, श्री. गोपाळ के. गुरव, श्री. गोपाळ बी. होनगेकर, श्री. संजीव डी. जोशी, श्री. आप्पाजी वाय. पाटील, सौ. सोनल सं. खांडेकर, श्रीमती सविता पुं. मोरे व सेक्रेटरी श्री. नागेंद्र बी. तरळे यांच्या सहकार्यातून संस्था प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडत आहे, प्रशस्त अशा बिल्डिंगमध्ये हायटेक कार्यालय सुरू होत आहे त्यामुळे संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जगदीश बिर्जे, संचालक – धनश्री मल्टीपर्पज सोसायटी
Belgaum Varta Belgaum Varta