बेळगाव : बेळगावात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो. उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरेपूर प्रयत्न केले जात असतात. यावर्षीचा गणेशोत्सव ही भक्तीभावात आणि आनंदाने साजरा करावा. मात्र गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीसाठी कदापिही परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांनी शांतता समिती बैठकीत बोलताना दिली.
वडगाव येथील जिव्हेश्वर मंदिरात पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पोलीस निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्यासह शहापूर विभाग गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, उपाध्यक्ष रमेश सोनटक्की, हेस्कॉमचे सहाय्यक अभियंते बेळीकट्टी तसेच शहापूर पोलीस ठाण्याचे एएसआय मनीकंठ पुजारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थित मंडळाच्या सूचना आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर बोलताना सिमानी पुढे म्हणाले, जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे गणेशोत्सवात विजेच्या संभाव्य धोक्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मंडळांनी मूर्ती आगमन आणि विसर्जना बरोबरच मंडळाच्या एकूण गणेशोत्सव काळातील कार्यक्रमाबाबत पोलीस स्टेशनला सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरून मंडळ आणि पोलिसांमध्ये योग्य तो समन्वय राहील.
मंडपा शेजारी रहदारीला जागा खुली ठेवावी. गणेशोत्सव काळात देखावे पाण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. या काळात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. मात्र तरीही समाजकंटकांच्या कारवायांवर, मंडळाच्या स्वयंसेवकांनी बारीक नजर राखावी. काही संशयास्पद हालचाली जाणवल्यास त्यासंदर्भात पोलिसांना तात्काळ माहिती कळवावी. प्रशासनाच्या वतीने मंडपात होमगार्ड अथवा पोलीस तैनात करण्यात येईल. मात्र तरीही मंडळांनी मंडपात शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्वयंसेवक तैनात करावेत. जमल्यास मंडपाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. महापालिकेच्यावतीने रस्त्यांची डागडूजी तर विजेच्या तक्रारीची दखल हेस्कॉम खात्याच्या वतीने घेतली गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी पोलिसांचे मंडळांना पूर्ण सहकार्य राहील, असेही सिमानी यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरसेवक रवी साळुंखे, नेताजी जाधव, रमेश सोनटक्की, यांनीही यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत गणेशोत्सव साजरा करताना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलीस ठाण्याचे एएसआय मनीकंठ पुजारी यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकीच्या शेवटी आभार मानले.