बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून बँकेची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगाव येथे संपन्न होत आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी बोलताना दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “बँकेच्या आजवरच्या इतिहासात बँकेने प्रथमच 156 कोटी 70 लाखाच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून 116 कोटी 12 लाखाची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेला 2 कोटी 76 लाखाचा ढोबळ नफा मिळाला असून निव्वळ नफा दोन कोटी पाच लाख रुपयांचा झाला आहे. बँकेचा एनपीए शून्य टक्के असून अहवाल सालात बँकेच्या ठेवीत 29 कोटी 23 लाखाची भरघोस वाढ झाली आहे. तसेच 21 कोटी 96 लाखाची कर्जामध्येही वाढ झाली असून ग्राहक व सभासदांनी ठेवलेल्या विश्वास व आर्थिक भक्कमतेचाच हा पुरावा दर्शवतो” असे ते म्हणाले. बँकेचे संपूर्ण कामकाज रिझर्व बँकेच्या निर्देशनाप्रमाणे चालते सीआरएआर प्रमाण 12% असावे असा रिझर्व निर्देश आहे पण आपल्या बँकेचे हे प्रमाण 14.43% आहे. बँकेने वेळोवेळी ठेवी व कर्ज व्याजदर याबाबत इतर बँकांचे स्पर्धात्मक व्याजदर यांचा अभ्यास करून माफक व्याजदर ठरवले आहेत. या आतापर्यंतच्या कारकीर्दीत गेली सतत तीन वर्षे ऑडिट रेटिंग ए मिळाले आहे.
सभासद हिताच्या अनेक योजना
बँकेने सभासदाच्या हिताच्या योजना नेहमीच आखलेल्या आहेत. यावर्षी अ वर्ग सभासदांना 20 टक्के तर ब वर्ग सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे. 75 वर्षाहून अधिक वयाच्या सभासदांना भेटवस्तू स्मृतिचिन्ह देऊन एका समारंभात अलीकडेच गौरविण्यात आले. तसेच गत वर्षाच्या वार्षिक सभेत ठरल्याप्रमाणे साठ वर्षावरील वयाच्या व 25 वर्षे सभासद असलेल्याना दोन हजार रुपयाचे गौरवधन (फक्त एकदाच) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा अनेक सभासदांनी लाभ घेतला आहे. मात्र यापूर्वी ज्यांना एक हजार रुपये गौरवधन दिले आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही.
बँकेचे कामकाज सर्व संचालकांच्या एकजुटीने चालते. बँकेच्या लेखापरीक्षण अहवालात कोणतेही गंभीर दोष आढळलेले नाहीत तसेच संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची कर्जेही वितरित करण्यात आलेली नाहीत. मात्र बँक, घर खरेदी, घर बांधणी, घर दुरुस्ती, व्यवसाय, लघुउद्योग, औद्योगिक व वाहन खरेदीसाठी कर्जाचा पुरवठा करीत आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना
2021-22 या आर्थिक वर्षापासून बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली असून ‘अ ‘वर्ग सदस्यांसाठी यशस्वीनी आरोग्य विमा राबवली जात आहे .आजवर त्याचा लाभ अनेकांना झाला आहे.
बँकेने सुरू केलेल्या आरटीजीएस व एनईएफटी सुविधेचा लाभ ग्राहक मोठ्या संख्येने घेत असून खातेदारांना एटीएम डेबिट कार्ड देण्यात आले आहे. याशिवाय डिजिटल बँकिंग अंतर्गत इतरही सुविधा दिल्या जात आहेत.
महिला सबलीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी बँकेने ग्रुप मायक्रो फायनान्स सुरू केले त्याचा शेकडो महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी उपयोग झाला. याही पुढे ही योजना कार्यान्वित राहणार आहे.
गुणवान पाल्यांचा सत्कार
बँकेच्या सभासदांच्या गुणवान पाल्यांचा सत्कार करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिलेल्या पाल्यांना 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रोख रक्कम , प्रशस्तीपत्र देऊन लोकमान्य रंगमंदिर येथे गौरविण्यात येणार आहे.
बँकेच्या तीन नव्या शाखा
बँकेच्या तीन नव्या शाखा सुरू करण्यास रिझर्व बँकेने परवानगी दिली असून लवकरच हिंडलगा, वडगाव आणि कणबर्गी येथे शाखा चालू करण्यात येणार आहेत. त्या शाखांसाठी जागा निश्चित करण्यात आली असून फर्निचर व इतर तयारी सुरू आहे.
बोर्ड ऑफ मॅनेजमेंट
रिझर्व बँकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमच्या बँकेतही बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्यात आले आहे त्याचे चेअरमन श्री. अनंत लाड हे असून त्यामध्ये सौ. सुवर्णा शहापूरकर, नितीन हिरेमठ, ज्ञानेश्वर सायनेकर, कमलेश मायानाचे हे संचालक आहेत.
बँकेचे संचालक आणि कर्मचारी वर्ग या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही ही प्रगती करीत आहोत असे ते म्हणाले. संचालक मंडळात सध्या व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण- पाटील, संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, सुवर्णा शहापूरकर, गजानन पाटील, रवी दोडन्नावर, यल्लाप्पा बेळगावकर, लक्ष्मी कानुरकर, सुहास तराळ, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, मारुती सिगीहळी, बसवराज इट्टी आणि रोहन चौगुले यांचा समावेश आहे. सौ.अनिता मूल्या या सीईओ म्हणून काम पाहत आहेत.